Home Breaking News जीवघेणा ठरणार का, तो पाण्याने भरलेला खड्डा…!

जीवघेणा ठरणार का, तो पाण्याने भरलेला खड्डा…!

514

राजूर कॉलरीतील ग्रामस्थ संतप्त

वणी : राजूर कॉलरीत रेल्वे सायडिंग च्या रॅम्प साठी चक्क वीस फूट खोलीचा खड्डा खोदण्यात आला. त्यात तुडुंब पाणी साचले, यामुळे गावातील नागरिकांच्या, लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट करत सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राजूर कॉलरीत वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांवर मानवी संकटाची शृंखला सातत्याने घोंगावत आहे. वेकोली, रेल्वे, विविध कंपन्यांनी ‘डेव्हलपमेंट हब’ बनविण्यासाठी स्थानिकांना बेजार केले आहे. आता तर रहिवासी क्षेत्राशेजारी रेल्वेने, सायडिंगचा रॅम्प बनविण्यासाठी खोल खड्डा तयार केला आहे. त्या खड्डयात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे.

राजूर येथे विविध कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. त्यांना आपल्या कोळशाची वाहतूक करण्यासाठी सायडिंग ची आवश्यकता आहे. येथे रेल्वे कडे भरपूर जागा उपलब्ध आहे आणि रेल्वेला कमाई वाढवायची असल्याने येथे सायडिंग च्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. त्यासाठी रॅम्प अत्यावश्यक असते. ती निर्माण करताना मोठ्या प्रमाणात माती, मुरुमाची आवश्यकता आहे. गौण खनिज वापरताना शासनाची परवानगी घ्यावी लागते. ती घेतली की नाही हे तपासणे गरजेचे झाले आहे.

रॅम्प साठी निर्माण केलेल्या खड्डयात पावसाचे पाणी जमा झाल्याने तो खड्डा आता जीवघेणा झाला आहे. रहिवासी क्षेत्राला लागून असल्याने त्या खड्डयात घसरून जीवित हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे. ग्रामपंचायती सोबतच प्रशासनाने वेळीच चौकशी करून संबंधित विभागावर कार्यवाही करावी व ह्या खड्डयामुळे जीवितहानी होणार नाही याकरिता सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
वणी: बातमीदार