● आरोपी सहा आणि दुचाक्या एकवीस
● वणी पोलिसांची कारवाई
सुनील पाटील: तालुक्यातील केसुर्ली लगतच्या जंगलात खुलेआम कोंबड बाजार खेळला जात होता. मुखबिराने याबाबतची माहिती वणी पोलिसांना दिली. पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला असता सहा जुगाऱ्याना ताब्यात घेत सात लाख 26 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार दि. 15 जुलै ला सायंकाळी करण्यात आली.
तालुक्यात अवैद्य धंदे डोकेवर काढत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. जंगलसदृश्य भागात मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी लपूनछपून कोंबड बाजार खेळल्या जातो. याप्रसंगी मुखबिराने खबर दिली म्हणून कारवाई सफल झाली परंतु 21 दुचाकी तर आरोपी सहा व कोंबडा एकच हे न उलगडणारे कोडे आहे.
रमेश वासुदेव बोथकर (48) रा. शास्त्री नगर वणी, विनोद भगवान बावणे (42) रा. परमडोह ता. वणी, चेतन गुलाब काळे (38) रा. रासा ता. वणी, नरेंद्र दिनेश्वर पातेकर (30) रा. माजरी ता. भद्रावती, राहुल अरुण मत्ते (28) रा. रासा ता. वणी, अनुराग सुरेश गोगला (28) रा. घुग्गुस असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
या कारवाईत कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या आरोपीं जवळून 11 हजार 350 रुपये रोकड, एक जखमी कोंबडा, दोन कात्या व 21 दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी दुचाकी घटनास्थळी सोडून गेलेल्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार