● तहसीलदार यांचे आदेश
वणी : तालुक्यात सातत्याने संततधार पाऊस सुरू आहे. त्यातच धरणातील पाण्याचा करण्यात आलेला विसर्ग यामुळे नदी, नाले, ओढे दुथडीभरून वाहताहेत. कोणताही अनुचित प्रकार घडूनये याकरिता प्रशासन सज्ज झाले असून तहसीलदार निखिल धुरधळ यांच्या आदेशाने दि. 19 जुलैला शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
तालुक्यात सतत बरसत असलेल्या पावसाने पूर्णतः दाणादाण उडाली आहे. नदी, नाले तुडूंब भरले आहेत. त्यातच बेबंळा, नवरगांव, अप्पर वर्धा, लोअर वर्धा ही सर्व धरणे पुर्ण भरली आहेत. त्या धरणातुन पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
वणी तालुक्यात वाहणाऱ्या प्रमुख चार नद्या आहेत. यात वर्धा, पैनगंगा, विदर्भा आणि निर्गुडा तसेच ठीक ठिकाणी वाहणारे नाले, ओढे दुथडीभरून वाहताहेत. वणी शहरात व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी ग्रामीण भागातून ये-जा करतात. पूर परिस्थिती बघता कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता खबरदारी म्हणून तहसीलदार यांनी एक दिवस शाळा बंदचे आदेश दिले आहेत.
वणी: बातमीदार