Home Breaking News जिल्ह्यातील Crime update | आत्महत्या, गुन्हेगारी, अपघात, मारहाण आणि …..

जिल्ह्यातील Crime update | आत्महत्या, गुन्हेगारी, अपघात, मारहाण आणि …..

818
Img 20240930 Wa0028

मुलाला फोन करून गळफास घेतला

वणी | शहरालगत असलेल्या लालगुडा येथील पटवारी कॉलनीतील 46 वर्षीय वेकोलि कर्मचाऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवार दि. 19 जुलै ला पहाटे घडली. मात्र गळफास घेण्यापूर्वी त्यांनी मुलाला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

सुनील बापूजी नरूले (46) असे मृतकाचे नाव आहे, ते लालगुडा परिसरातील पटवारी कॉलनीत वास्तव्यास होते. ते वेकोलि च्या जुनाड कोळसा खाणीत कार्यरत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ते आपल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले.

एमआयडीसी परिसरातील हनुमान मंदिराजवळून त्यांनी मुलगा स्वप्नील ला फोन केला व आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. मुलाने क्षणाचा विलंब न करता घटनास्थळ गाठले मात्र उशीर झाला होता. झाडाला नॉयलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिलांना बघून मुलाने हंबरडा फोडला.

घटना उघडकीस आल्यानंतर प्रत्यक्षदर्शीने वणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मूतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. नरूले यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

कारच्या धडकेत तरुण जखमी

यवतमाळ | भरधाव वेगात आलेल्या कारने तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना 17 जुलै रोजी रात्री 9.15 वाजता शहरातील कॉटन मार्केटमध्ये घडली.

जखमीचा चुलत भाऊ अंबिका नगर रहिवासी शुभम कश्यप (26) यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात 18 जुलै रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, फिर्यादीचा भाऊ मनसुख कश्यप (32) हा कॉटन मार्केटच्या आवारात उभा होता.

त्याचवेळी त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक MH 29 BV 1838 ने धडक दिली. ज्यात मनसुख गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सदर कार चालकावर भादंवि कलम 279, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

किरकोळ वादात चाकू हल्ला

दिग्रस | किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. ज्यामध्ये एकाने दुसऱ्याला चाकूने वार करून जखमी केले. ही घटना 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता दिग्रस येथील गवळीपुरा येथे घडली.

गवळीपुरा येथील रहिवासी सलीम जुम्मा खलीखाऊ (42) यांनी दिग्रस पोलिस ठाण्यात 18 जुलै रोजी तक्रार केली होती. तक्रारीनुसार, तक्रारदार रविवारी दुपारी बाजारात जात होते. त्यानंतर आरोपी तरुण त्यांच्याकडे आला आणि वाद घातला.

यावेळी तुमच्या मुलाने गाडीवर काम करण्यासाठी मजुरांना 400 रुपये का देतो, असा सवाल करत शिवीगाळ सुरू केली. यानंतर हातावर चाकूने वार करून जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी गवळीपुरा येथील असलम आलमवाले (30) याच्याविरुद्ध भादंवि कलम 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

जखमी महिलेचा मृत्यू

नेर | भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने टाटाएस वाहनाला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 55 वर्षीय महिलेचा नुकताच रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुमन उद्धव कुलकर्णी (55) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या नेर मधील आंबेडकर चौकत वास्तव्यास होत्या. याप्रकरणी मृतकाच्या कुटुंबीयांनी, 18 जुलैला नेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, MH 29 BD 0343 क्रमांकाच्या वाहनाने विरुद्ध बाजूने येणाऱ्या MH 29 T 5921 क्रमांकाच्या टाटा एस वाहनाला धडक दिली. नेर अमरावती मार्गावर 26 जून रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात वाहनात बसलेल्या सुमन कुलकर्णी (55) या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी वटफळी येथील पंकज डोंगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने वृद्धांच्या डोक्यात घातला दगड

पुसद | घराच्या अंगणात पाणी टाकण्यावरून वृद्धाशी झालेल्या वादातून महिलेने वृद्धांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पुसद येथील पोखरी गावात घडली.

या घटनेची तक्रार पोखरी येथील श्याम धोत्रे (60) यांनी सोमवारी रात्री पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. घराच्या अंगणात पाणी का टाकले, अशी विचारणा करत आरोपी महिलेने शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात दगडफेक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

करंजी येथून मोटारसायकल लंपास

पांढरकवडा | स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजी येथील उड्डाणपुलाजवळून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना 16 जुलैला घडली.

याप्रकरणी सोमवारी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथील रहिवासी बंडू जागो महाकुलकर हे काही कामानिमित्त करंजी येथे गेले होते. त्यांनी त्यांची दुचाकी करंजी येथील उड्डाणपुलाच्या बाजूला उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून सदर दुचाकी लंपास केली.

मेटॅडोरच्या धडकेत एक गंभीर जखमी

पांढरकवडा | भरधाव मेटॅडोरची धडक लागून एकजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील मराठवाकडी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी पांढरकवडा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

किसन सिडाम असे जखमीचे नाव आहे. तो मराठवाकडी रस्त्याने जात असताना भरधाव मेटॅडोरने त्याला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. किसनची पत्नी चंदा सिडाम हिने याबाबत तक्रार केली.

तीन लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त

मुकुटबन | येथून जवळ असलेल्या व मुकुटबन पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या नेरड येथील नितीन राजूरकर याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन लाख 83 हजार 866 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. 18) सायंकाळी करण्यात आली.

नितीन राजूरकर हा मुकुटबनसह परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती मुकुटबन पोलिसांना मिळाली. घटनास्थळी धाडसत्र अवलंबण्यात आले असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत करण्यात आला.