Home Breaking News जिल्ह्यातील Crime update | अपघाताची शृंखला, दोघां भावांचा मृत्यू, पत्नीवर हल्ला आणि….

जिल्ह्यातील Crime update | अपघाताची शृंखला, दोघां भावांचा मृत्यू, पत्नीवर हल्ला आणि….

795

अज्ञात वाहनाची धडक, दोघे भाऊ ठार

पुसद | हर्षी या आपल्या गावी परतणाऱ्या दोघा दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री 9 वाजता सुमारास घडली.

रामराव मारकड (40) व गिरीधर मारकड (38) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी चुलत भावांची नावे आहेत. ते हर्षी येथील निवासी आहेत, घटनेच्या दिवशी ते आपल्या दुचाकी क्रमांक MH- 29-Y- 3979 ने चिरंगवाडी येथून हर्षीकडे पुसद मार्गाने परतत होते. आदिवासी आश्रमशाळेच्या चौफुलीवर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

घटनास्थळावर ते बराच वेळ पडून होते, त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. अतिरक्तस्रावाने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोघा भावांच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

संशयी पतीचा पत्नीवर प्राणघातक हल्ला

यवतमाळ | शहरातील बोरले ले-आऊट येथे संशयी पतीने पत्नीवरच प्राणघातक हल्ला चढवला. ही घटना 18 जुलै ला सकाळी घडली. पत्नीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

राजू कुडमेथे असे पतीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी संशयावरून त्याने पत्नीला मारहाण केली. प्राणघातक हल्ला झाल्याने घाबरलेल्या कोमल कुडमेथे हिने 19 जुलै ला रात्री अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती राजू कुडमेथे याच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

बाभूळगाव | तालुक्यातील 22 वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली.

चेतन पेरकुंडे (22) असे मृताचे नाव आहे. तो नांदुरा या गावात वास्तव्यास होता. गवंडी फाट्या लागत कडूकर यांच्या शेतात त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

दुचाकीवरील नियंत्रण सुटले, एक ठार

पुसद | काळी दौलतखान येथून पोखरीमार्गे दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वाराच्या समोर अचानक म्हैस आडवी आली. यामुळे नियंत्रण सुटले, या घटनेत एक युवक ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

अविनाश पोटे (32) असे मृतकाचे नाव आहे, तो हिवळणी येथील निवासी आहे. तर या अपघातात सुधीर आगोशे (32) हा गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकीने गावी परतत असताना अचानक म्हैस आडवी आली. यामुळे त्यांचे दुचकीवरील नियंत्रण सुटले आणि खाली कोसळले. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अविनाश जागीच ठार झाला. सुधीरच्या पाठीला जबर दुखापत झाली असून त्याचेवर उपचार सुरू आहे.

चक्क 11 शेळ्या चोरल्या

वडकी | शेतात बांधलेल्या 11 शेळ्या चोरट्याने लंपास केल्याची घटना 19 जुलै ला सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी वडकी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धनराज महादेवराव परचाके (35) रा बोरी असे तक्रारदार शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांनी शेतात शेळ्या बांधल्या होत्या. 55 हजार रुपये किमतीच्या 11 शेळ्या अज्ञात चोरट्याने लांबवल्या ही बाब सकाळी निदर्शनास आल्यानंतर वडकी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.