● पहिल्या टप्प्यात कोना येथून सुरुवात
वणी: तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची सर्वाधिक झळ कोना या गावाला बसली. येथील 849 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले तर 45 जनावरांना हलविण्यात आले होते. सध्या पूरपरिस्थिती नियंत्रणात असून बधितांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकरांनी पंधरा दिवस पुरतील एवढे अन्नधान्याचे वाटप गुरुवारी केले.
तालुक्यातील रांगणा, भुरकी, जुनी सावंगी, जुनाड, शेलु (खु), झोला, कोना, उकणी अशा अकरा गावात पुराने थैमान घातले होते. वर्धा नदी चांगलीच कोपली होती त्यातच धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे नदीची पाणीपातळी कमालीची वाढली. पुराने थैमान घातले, सर्वत्र दाणादाण उडाली. 11 गावात पाणी शिरले, 28 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने अवघ्या काही वेळातच होत्याचे नव्हते झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर पीडितांना घरपोच मदत पोहचविण्याचा विडा उचलला आहे. पहिल्या टप्प्यात कोना येथील नागरिकांना धान्याचे किट व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या किट मध्ये तांदुळ, कणिक प्रत्येकी 5 किलो, साखर, तुर दाळ प्रत्येकी 1 किलो, साबण, चहापत्ती, तेल, मीठ, मसाला, माचीस आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
तालुक्यातील कोना 849, झोला 551, उकणी 415, भुरकी 51, रांगणा 95, जुनाडा 21, शेलू (खु) 15, कवडशी 4, शिवणी 18, चिंचोली 52 अशा 2071 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. आता पूरपरिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे स्थलांतरित नागरिक आपापल्या गावी परताताहेत. पूर पीडितांना जीवनावश्यक साहित्य व औषधीची मदत गरजेची झाली आहे.
धान्य वाटप करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांचेसह महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर, मनसेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष प्रवीण डाहुले, वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख, विलन बोदाडकर, अरविंद राजुरकर, संकेत पारखी, रोशन शिंदे व महाराष्ट्र सैनिक परिश्रम घेत आहे.
वणी: बातमीदार