Home Breaking News जिप व पंस आरक्षण सोडतीने अनेकांचा हिरमोड

जिप व पंस आरक्षण सोडतीने अनेकांचा हिरमोड

1514

प्रस्थापित राजकिय पुढाऱ्यांना धक्का

वणी | न्यायालयाच्या ओबीसी अरक्षणांनंतर निर्णयानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. वणी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांपैकी चार ठिकाणी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.

वणी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून असलेल्या राजकीय धुरंधाराच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही मतदारसंघात शिवसेनेचे तर काही ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. तर मनसे सुध्दा जिल्हा परिषद मतदारसंघ काबीज करण्यासाठी सरसावली आहे. मात्र आरक्षण सोडतीने राजकीय पुढाऱ्यांनी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने केलेली तयारी क्षणात ध्वस्त झाली आहे.

शिरपूर-कायर गटात सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. शिंदोला-तरोडा या गटात ओबीसी महिला, वेल्हाळा-नांदेपेरा गटात सर्वसाधारण, राजूर- चिखलगाव अनुसूचित जमाती तर वागदरा-घोंसा गटात ओबीसी महिला असे आरक्षण निघाले आहेत.

या प्रमाणेच तालुक्यातील दहा पंचायत समिती गणात घोंसा- अनु जाती, वागदरा- अनु जमाती, नांदेपेरा- अनु जमाती महिला, राजूर- ओबीसी, शिंदोला- ओबीसी महिला, शिरपूर- सर्वसाधारण महिला, चिखलगाव- सर्वसाधारण महिला, कायर- सर्वसाधारण, तरोडा- सर्वसाधारण महिला, वेल्हाळा- सर्वसाधारण असे गण निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार