Home Breaking News Breaking….तालुक्यातील सहा गावांचा संपर्क तुटला, सात मार्ग बंद

Breaking….तालुक्यातील सहा गावांचा संपर्क तुटला, सात मार्ग बंद

3108

वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

वणी | तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. त्यातच धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे वर्धा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात आज सकाळ पर्यंत 26 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील नद्या- नाले दुथडीभरून वाहत असल्याने सहा गावाचा संपर्क तुटला तर सात मार्ग बंद झाले आहेत.

हवामान खात्याने पूर्व विदर्भात रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज आहे. तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तालुक्यात जीवितहानी, पशुधन हानी झाली नाही मात्र शेतशिवारात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. नदी- नाले दुथडीभरून वाहत असल्याने कवडशी, भुरकी, नवीन सावंगी, शेलू, चिंचोली, झोला, जुनाड, जुगाद या गावाचा संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील नदी- नाल्याना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे कवडशी मार्ग, शिवानी मार्ग, वरोरा, सावंगी, भुरकी, चिंचोली व जुगाद हे मार्ग बंद झाले आहेत.

मारेगाव तालुक्यात सुध्दा मंगळवारी पावसाने चांगलाच हाहाकार माजवला त्यातच बेंबळा धरणाचे दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे कोसारा, दापोरा, नवरगाव, पाटाळा, कुंभा हे मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. वर्धा नदीकाठावरील सावंगी, शिवणी, आपटी, दांडगाव, झगडारीठ, वनोजा, चिंचमंडळ, दापोरा, गोरज, कानडा, पारडी, चनोडा, मुक्टा गावांना वर्धा नदीच्या पुराचा धोका असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील अकरा गावांना पुराचा फटका बसला होता. 30 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली होती. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती तर पशुधन दगावले होते. पावसाने उसंत देताच प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असतानाच पुन्हा निसर्ग कोपला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज झाला आहे.
वणी: बातमीदार