Home Breaking News पुरपीडितांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, माजी सरपंच ‘आक्रमक’

पुरपीडितांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, माजी सरपंच ‘आक्रमक’

284

वेकोलीचा बेजबाबदारपणा, स्थानिकांना फटका

वणी: तालुक्यातील उकणी या गावात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते. तब्बल दिडशेच्या वर घरांची पडझड झाली, शेतीतील पिके वाहून गेलीत, पशुधन दगावले. याला सर्वस्वी वेकोली प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून घरांची पडझड झालेले व शेतपिके बधितांना प्रत्येकी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच संजय खाडे यांनी SDO यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

वेकोलीच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. वर्धा नदीपात्रालगत कोळसा खाणीतून उत्खनन झालेल्या मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह थांबकला आणि पुराचे पाणी गावात शिरले. यामुळे दिडशेच्या वर घरांना क्षती पोहचली आणि संपूर्ण शेतजमीन पिकासह पाण्याखाली बुडाली, त्यात शेतीपयोगी अवजारे व खत पूर्णतः नदीच्या पुरात वाहून गेली.

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे उकनी गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आठ ‘अ’ यादी नुसार प्रत्येक घराला 1 लाख रुपये आर्थिक अनुदान व शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये आर्थिक अनुदान तात्काळ सर्वे करून देण्यात यावे, तसेच तातडीने गावाचे पुनर्वसन करावे, शेतकऱ्यांची उर्वरित 10 टक्के जमीन तात्काळ संपादित करावी व बेरोजगारांना तात्काळ रोजगार देण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

माजी सरपंच संजय खाडे यांनी उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून तात्काळ अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. या महापुरात गावातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. स्थानिकांत रोष निर्माण होण्यापूर्वी निर्णय घ्यावा असे बोलल्या जात आहे. यावेळी संगीता खाडे, सतीश खाडे, आशिष बलकी, प्रविण खेमेकर, सुरज पारशिवे, अजय खाडे, राजू धांडे, सतीश लोडे, यश निंदेकर, हिरादेवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी : बातमीदार