● पत्नीला संपवण्याचा तीनदा झाला प्रयत्न
वणी: पती आणि पत्नीचे नाते हे विश्वास आणि प्रेम यावर टिकलेले असते. एकमेकांवरचा विश्वास हा पती आणि पत्नीच्या नात्याचा, सहजीवनाचा पाया असतो. संशयाने हा पायाच ढासळला तर दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण होते. यातून तिला संपवण्याची अविवेकी कृती घडते. असाच प्रकार तालुक्यात गुरुवारी सायंकाळी घडला. पतीनेच पत्नीला संपवण्याची ‘सुपारी’ दिल्याने खळबळ माजली.
जितेंद्र मशारकर (45) रा. चंद्रपूर, संजय राजेश पट्टीवार (30) रा. चंद्रपूर, महमंद राजा अब्बास अन्सारी (20) हल्ली मुक्काम चंद्रपूर मूळ बिहार असे अटकेतील आरोपींची नावे आहे. या घटनेतील एक आरोपी पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
तालुक्यातील नायगाव फाट्यावर गुरुवारी सायंकाळी शिक्षिकेवर प्राणघातक चाकूहल्ला करण्यात आला होता. असाच खुनी प्रयत्न यापूर्वी तीनदा झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. शिरपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत तपासाची दिशा ठरवल्यानंतर शिक्षिकेवरील हल्ल्याचा मास्टर माईंड पत्रकार पतीच असल्याचे स्पष्ट झाले.
वैशाली छल्लावार (40) असे शिक्षिकेचे नाव आहे. वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नायगाव (बु) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. तीचे वास्तव्य चंद्रपूरला असल्याने गावी जाण्यासाठी नायगाव फाट्याजवळ बसची वाट पाहत होती. याचवेळी तिच्यावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला.
जितेंद्र मशारकर हा ‘त्या’ शिक्षिकेचा पती असून चंद्रपूरला वास्तव्यास आहे. तो एका वृत्तपत्रात बातमीदार म्हणून काम करतो. तो सातत्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात खटके उडायचे. सतत वाद वाढतच असल्याने त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्याने पत्नीवर हल्ला करण्याची सुपारी दिली.
पोलिसांनी चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला त्वरित ताब्यात घेतले होते. यापूर्वी सुद्धा त्या शिक्षिकेवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. ती पार्श्वभूमी तपासून खऱ्या आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी तपास यंत्रणा कार्यान्वित केली. तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास PSI रामेश्वर कंदुरे करताहेत.
वणी: बातमीदार