● तात्काळ बससेवा सुरू करा, शिवसेना आक्रमक
वणी: शिंदोला परिसरातील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनीना बसफेरी अभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शालेय वेळेत बससेवा उपलब्ध नसल्याने वणी ला ये- जा कशी करावी असा यक्षप्रश्न विद्यार्थ्यापुढे उभा ठाकल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी आक्रमक भूमिका घेत SDO डॉ. शरद जावळे यांना निवेदन देत तीन दिवसांत बसफेऱ्या सुरू कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिला आहे.
शिंदोला परिसरातील मुंगोली, माथोली, साखरा, परमडोह, चिखली, टाकळी, शेवाळा, चनाखा, कोलगाव, शिवणी, येनक, येनाडी, पाथरी, कुर्ली व लगतच्या गावातील शेकडो विद्यार्थी- विद्यार्थिनी शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षण वणीतील विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेताहेत. परंतु त्यांना वणी येथे ये- जा करण्यासाठी राज्य मार्ग परिवहनच्या बसची सुविधा उपलब्ध नाही.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शैक्षणिक धोरणात शासनाने आमूलाग्र बदल केले आहेत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता प्रशासन ठोस निर्णय प्रक्रिया राबवते मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचताना दिसत नाही.
शिंदोला ते वणी बससेवा शालेय वेळेत सुरु करणे गरजेचे आहे. याकरिता तीन वेळा बसफेरी सुरू केल्यास विद्यार्थ्यांना योग्यवेळेत शाळा, महाविद्यालयात पोहचता येणार आहे. बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, प्रसंगी शैक्षणिक नुकसानासह मनस्ताप सहन करावा लागत असल्याने विद्यार्थी- विद्यर्थिनी मध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी शिंदोला ते वणी सकाळी 6 वाजता, 9:30 वाजता, दुपारी 1:30 वाजता अशा शिंदोला ते वणी बसफेरी सुरू करावी. तसेच वणी ते शिंदोला सकाळी 8 वाजता, 12:30 वाजता व सायंकाळी 5: 30 वाजताची मुक्कामी बससेवा कार्यान्वित करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तीन दिवसात बससेवा सुरू न झाल्यास दि. 25 ऑगस्ट ला स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांच्यासह शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी शिवसेना उप जिल्हा प्रमुख संजय निखाडे, शहर प्रमुख सुधीर थेरे, महेश चौधरी, प्रशांत बलकी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी व शिवसैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार