● सहा दिवसापासून देत होता गुंगारा
वणी: पतीनेच पत्नीला कायमचे संपवण्याची सुपारी आपल्याच मित्राला दिली होती. तीनवेळा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र प्रत्येक वेळी ती थोडक्यात बचावली. शिरपूर पोलिसांनी मास्टर माईंड पतीसह दोघांना ताब्यात घेतले होते परंतु खरा सुपारीबहाद्दर दीपक मल्लया सेंगारप (35) गुंगारा देत होता. त्याला बुधवार दि. 24 ऑगस्टला चंद्रपूर मधून शिताफीने जेरबंद करण्यात आले.
तालुक्यातील नायगाव फाट्यावर गुरुवार दि. 18 ऑगस्ट ला सायंकाळी वैशाली छल्लावार (40) ह्या शिक्षिकेवर प्राणघातक चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेने चांगलीच खळबळ माजली होती. पोलिसांनी चाकूहल्ला करणाऱ्या महमंद राजा अब्बास अन्सारी (20) याला नागरिकांच्या मदतीने शेतातून ताब्यात घेतले होते.
शिक्षिकेवरील हल्ला प्रकरणाचे गूढ वाढत असतानाच शिरपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कंदुरे यांनी तपासाची दिशा निश्चित केली. पती- पत्नी मधील विसंवाद कारणीभूत असल्याने पत्नीला संपवण्याची सुपारीच पतीने दिल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासात पुढे आली होती.
पती जितेंद्र मशारकर (42) याने पत्नी वैशालीला कायमचे संपवण्यासाठी आपला जुना मित्र दीपक मल्लया सेंगारप (35) रा लालपेठ चंद्रपूर याला दोन लाख रुपयांची “सुपारी” दिली. यातील पन्नास टक्के रक्कम प्रदान करण्यात आली तर उर्वरित रक्कम काम फत्ते झाल्यावर देण्याचे ठरले.
शिक्षिका वैशाली छल्लावार (40) यांच्यावर यापूर्वी दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. यामुळे त्यांनी दुचाकीने प्रवास करणे बंद केले होते त्या बस ने ये- जा करायच्या. घटनेच्या दिवशी दीपक सेंगारप, संजय पट्टीवार व राजा अन्सारी हे तिघे मोपेड दुचाकीने नायगाव फाट्याजवळ आले. राजा अन्सारी ला सावज टिपण्याचा आदेश दिला आणि यावेळी सुध्दा “ती” बचावली.
दीपक सेंगारप हा पत्रकार जितेंद्र मशारकर याचा जुना मित्र आहे. तो एका हॉटेलात व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याने मित्राच्या पत्नीला संपवण्याची सुपारी तर घेतलीच होती. तसेच तो जितेंद्र ला वारंवार पैसे देखील मागायचा, अशा प्रकारे त्याने बरीचशी रक्कम उकळल्याचे बोलल्या जात आहे.
वणी: बातमीदार