Home Breaking News वृद्धेसह 8 रुग्णाचे रेस्क्यू, पाच मार्ग बंद, चार गावाचा संपर्क तुटला

वृद्धेसह 8 रुग्णाचे रेस्क्यू, पाच मार्ग बंद, चार गावाचा संपर्क तुटला

1308

पावसाने व पुराने पुन्हा उडवली दाणादाण

वणी | परतीच्या पावसाने व धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे तालुक्यात पुन्हा दाणादाण उडवली आहे. बुधवार दि. 14 सप्टेंबर ला यवतमाळ येथून आलेल्या रेस्क्यू (rescue) टीम ने कवडशी येथील गंभीर आजारी असलेल्या 90 वर्षीय वृद्धेसह 8 रुग्णांना गावातून सुरक्षित बाहेर काढून उपचारार्थ हलवले आहे. तर पुराचे पाण्यामुळे चार गावाचा संपर्क तुटला असून पाच मार्ग बंद झाले आहेत.

यावर्षी पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे, परिसरातील धरणे पूर्णतः भरली आहे. यामुळे वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून परिसरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नदी, नाले दुथडीभरून वाहताहेत.

तालुक्यातील मूर्ती, सावंगी, चिंचोली, कवडशी या चार गावाला पाण्याने वेढले आहे. यामुळे त्या गावाचा संपर्क तुटला आहे. तर बोरी ते मूर्ती, सावंगी, चिंचोली, कवडशी व वरोरा हे मार्ग बंद झाले आहेत. कवडशी येथील 90 वर्षीय महिला गंभीर आजारी असल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनासोबत संपर्क साधला. व रेस्क्यू करण्याचे आर्जव केले. प्रशासनाने तातडीने यवतमाळ येथील रेस्क्यू (rescue) टीम ला पाचारण केले.

यावर्षी वर्धा नदी चांगलीच कोपली आहे, यापूर्वी आलेल्या पुराने सुध्दा दाणादाण उडवल्याचे नदी काठावरील गावात वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी अनुभवले आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली त्यातच निम्न वर्धा प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडत आहे.
वणी: बातमीदार