● 30 हजाराचे दागिने लंपास
वणी | शहरात सोन्याच्या दागिन्याला साफ करण्याचा बनाव करत दागिने लंपास करणारी टोळी सक्रिय झाली आहे. शहरातील नटराज चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याच्या पत्नीला सोने चमकावून देतो म्हणत 30 हजार रुपये किमतीच्या चार बांगड्या लंपास केल्याची घटना शुक्रवार दि. 23 सप्टेंबर ला सकाळी घडली. मात्र ते भामटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
शहर व परिसरात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे, त्यातच फसवेगिरी करणारे भामटे सुद्धा अवतरल्याने गृहिणी व नागरिकांची फसगत होत आहे. भामटे नवनवीन युक्त्या अवलंबत गृहिणींना टार्गेट करत आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नटराज चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यापाऱ्यांच्या घरी दोन भामटे सेल्समन च्या वेशात पोहचले. त्यावेळी व्यापाऱ्यांची पत्नी व आई ह्या दोघीच घरी होत्या. भमट्यानी फरशी पुसण्याचे पावडर विक्री करीत असल्याची बतावणी केली.
फारशी साफ करण्यासोबतच दागिनेही चमकावून देतो असे सांगितल्याने व्यापाऱ्याच्या पत्नीचा विश्वास बसला आणि तिने जुन्या असलेल्या चार सोन्याच्या बांगड्या त्या भमट्याला दिल्या. चोरट्याने एका डब्यात त्या बांगड्या टाकून गॅस शेगडीवर ठेवण्यास सांगितले. गृहिणीने डब्बा उघडून बघितलं असता त्या डब्ब्यातील बांगड्या गायब झाल्याचे लक्षात आले. परंतु तोपर्यंत दोन्ही भामटे पसार होण्यात यशस्वी झाले.
गृहिणींना सहज फसवता येत असल्याने भामटे शिरजोर झाल्याचे दिसत आहे. मात्र लगतच असलेल्या सीसीटीव्हीत दोन्ही भामटे कैद झाले असून पोलीस त्यांच्या पर्यंत पोहचणार का याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
वणी: बातमीदार