● यवतमाळ वरून मुंबईला जात होती बस
● नाशिक जवळ आज पहाटे घडली घटना
सुनील पाटील: यवतमाळ वरून मुंबईला जात असलेली चिंतामणी ट्रॅव्हल्स या खाजगी बसला नाशिक जवळ भीषण आग लागली. बसचा पूर्णतः कोळसा झाला असून 10 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 23 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही भीषण घटना शनिवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली.
चिंतामणी ट्रॅव्हल्स ची बस क्रमांक MH- 29- AW- 3100 ही स्लीपर कोच प्रवाश्यांसह मुंबईला जात होती. सर्व प्रवाशी साखरझोपेत असताना नाशिक जवळ औरंगाबाद मार्गावरील कैलासनगर परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने बसच्या पेट्रोल टॅंक ला धडक दिली अशी प्राथमिक माहिती मिळाली. यावेळी बसने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले.
प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. तोपर्यंत काही जखमींना बसच्या बाहेर काढण्यात यश आले मात्र वरच्या बर्थ वर झोपलेल्याना काढण्यात अडचण निर्माण झाली होती.
इंधनाचा भडका उडाल्याने भीषण आग लागल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे तर मृतकाच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केले आहे. जखमींवर मोफत उपचार करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
वणी: बातमीदार