Home सामाजिक कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर खाण्याचे फायदे

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खीर खाण्याचे फायदे

153

पौराणिक काळापासून चालत आलेली प्रथा

|| ऋषिकेश नाईक (पुणे)||
अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. यंदा 9 ऑक्टोबर रविवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी होत आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा मसाला दूध ठेवण्याची परंपरा आहे.

पौराणिक कथानुसार समुद्र मंथनावेळी माता लक्ष्मी प्रगट झाली होती. या पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांवर प्रसन्न होते अशी मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेला कौमुदी व्रत नावानेही ओळखले जाते. याच दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला असे सांगितले जाते. तसेच शरद पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने महारस केले.

भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवून गोपींना आपल्याकडे बोलावले आणि त्यांना अमृत पाजले. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्रीचे विशेष महत्त्व आहे. या रात्री, चंद्राच्या 16 कलांसह, चंद्र पृथ्वीवर शीतलता, पौष्टिक शक्ती आणि शांततेचा अमृत वर्षाव करतो.

शरद पौर्णिमेच्या रात्री काय करावे व काय करू नये दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर मानला जातो. या दिवसांमध्ये, तुम्ही चांदण्यांचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुम्ही वर्षभर निरोगी आणि आनंदी राहाल.
दृष्टी वाढवण्यासाठी दसऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत दररोज रात्री 15 ते 20 मिनिटे चंद्राकडे पाहण्याचा सराव करा.
या रात्री सुईत धागा ओवण्याचा सराव केल्याने दृष्टी वाढते.
शरद पौर्णिमेला गरोदर स्त्रीच्या नाभीवर चंद्रप्रकाश पडला तर गर्भधारणा निश्चिंत होते.
या दिवशी शारीरिक संबंधांपासून दूर राहावे. असे मानले जाते की, या दिवशी जन्मलेली मुले अपंग होण्याची शक्यता असते.

अशा प्रकारे घ्या खीरचा आस्वाद
कोजागरीची खीर किंवा दूध लोहाच्या किंवा पितळी भांड्यात शिजवावी. रात्री 8 वाजता बारीक कापडाने झाकून चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीला अर्पण करून प्रसाद म्हणून खावी. पण रात्री उशिरा हे दूध पितो किंवा खीर खातो, त्यामुळे थोडी कमी घ्यावी.

खीर खाण्याचे फायदे
असे मानले जाते की, शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने अनेक रोगांपासून आराम मिळतो. ही खीर चर्मरोगाने त्रस्त लोकांसाठी अमृत मानली जाते आणि यासोबतच ही खीर दृष्टी वाढवणारी देखील मानली जाते. ही खीर खाल्ल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

[ आमचा अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही. हिंदू संस्कृती च्या मान्यतेने चालत आलेल्या ह्या प्रथा परंपरा किंबहुना दंत कथा सुद्धा असू शकते ]