● बस स्थानकावर चोरट्याचा प्रताप
तुषार अतकारे | अगदी काही दिवसांवर येवून ठेपलेला दिवाळीचा उत्सव, खरेदीची लगबग आणि त्यातच चोरट्यांचा हैदोस. सोमवार दि. 17 ऑक्टोबरला दुपारी बस स्थानकावरून घुग्गुसला जात असताना बस मधून महिलेच्या पर्स मधील पन्नास हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.
मंदा आनंदराव येनपोतवर असे त्या महिलेचे नाव आहे. त्या घुग्गुस ला जात असताना ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून शहरात चोरट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. लहानसहान चोरीच्या घटना, घरफोडी, पाकिटमारी नित्याचेच झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता स्वतः उप विभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार हे लक्ष ठेवून आहे. त्याप्रमाणेच रात्रपाळीतील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वणी पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. ठाणेदार रजेवर गेले आहेत तर एक पोलीस उप निरीक्षक निलंबित झाल्यामुळे अधिकारी जेमतेम आहेत. कर्मचारी निश्चितच कमी आहे मात्र अधिकचे होमगार्ड दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना दिली होती.
घटना घडताच घाबरलेली महिला तक्रार दाखल करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात पोहचली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास आरंभला आहे. परंतु पोलीस ठाण्यातील वीज पुरवठा पावसामुळे खंडित झाल्याने अद्याप FIR दाखल झाला नाही.
वणी: बातमीदार