● ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल
● 35 लाखाची मागणी केल्याचा आरोप
● तत्कालीन सरपंचाचा उधळला होता डाव
रोखठोक | खडकी (गणेशपूर) येथील ‘दारुभट्टीसाठी’ आग्रही असणाऱ्या ग्रामसेवक व महिला सदस्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात रणरागिणी ग्रामपंचायत महिला सदस्याने ग्रामसेवकाला चांगलेच धारेवर धरत “तुम्ही नाहरकत तर द्या आणि बघाचं” असा सज्जड दम भरला आणि 35 लाखाची डील होत असल्याचा खळबळजनक आरोप केला.
झरी जामनी सारख्या आदिवासी बहुल भागातील गावात दारूचा पूर वाहवा या करिता प्रशासकीय यंत्रणाच कार्यान्वित असल्याची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. विद्यमान ग्रामसेवकाने महिला ग्रामपंचायत सदस्यांला भ्रमणध्वनी वरून फोन केला आणि प्रस्तावित दारुभट्टीच्या प्रक्रिये करिता पुढाकार घ्यावा असे सुचवले.
रणरागिणी महिला सदस्याने ग्रामसेवकाला चांगलेच फटकारले, विकास कामाबाबत साधी विचारणा करण्यात येत नाही. मात्र दारुभट्टी करिता सर्व सदस्यांची मनधरणी करण्यात येत आहे. तत्कालीन सरपंच यांनीसुद्धा दारुभट्टीसाठी असाच प्रकार केला होता. ग्रामस्थांनी त्यांना असलेला वरिष्ठांचा “आशिष” धुडकावून त्यांची मागणी केराच्या टोपलीत टाकल्याचे महिला सदस्यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा कमालीची खालावली आहे. ग्रामपंचायत सदस्यांना अलगद कवेत घेण्याचे कसब ग्रामसेवकात असल्याचे सिद्ध झाले आहे. सात पैकी पाच सदस्यांना ‘मॅनेज’ करून आपले व त्यांचे आर्थिक हित साध्य करण्याची भूमिका चोख बजावत असल्याचे ‘त्या’ ऑडिओ क्लिप मधून उजागर होत आहे.
देशी दारू दुकाना करिता सर्वच ग्रामपंचायत सदस्य तयार होते. मी त्या नुसार दारुभट्टी बाबतचा विषय पत्रिकेवर घेतला होता.
प्रतीक कापसे
ग्रामसेवक, खडकी गणेशपूर
सदर दारू दुकानाला माझा विरोध आहे.17 ऑक्टोबर ला ग्रामसभा घेण्यात आली. या मध्ये दारू दुकानाचा विषय घेण्यात आला होता. यावेळी हा विषय मासिक सभेत ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. मात्र आमचा या दारू दुकानाला तीव्र विरोध राहणार आहे. दारुभट्टी नकोच अशी भूमिका आम्ही घेतली आहे.
सविता बांदूरकर
ग्रा. पं. खडकी गणेशपूर