● 4 गटाचे 63 उमेदवार रिंगणार
● आजी माजी आमदार आमने सामने
रोखठोक :- तालुक्यात थंडीचा जोर वाढत चालला आहे. गुलाबी थंडीची चाहूल सुरू झालेली असतांनाच वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फँक्ट्रीच्या निवडणुकीने मात्र वातावरण चांगलेच तापले आहे. वसंत जिनिगच्या अध्यक्षासह आजी माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीची रंगत कमालीची वाढली आहे.
वसंत जिनिंग मधे होत असलेल्या 17 संचालकाच्या निवडी साठी 6 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत चार गटाचे 63 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. काँग्रेस पक्षात फूट पडल्याने काँग्रेसचे नेते तथा जिनिंगचे अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यामुळे माजी आमदार वामनराव कासावर यांनी दुसरा गट निवडणूक रिंगणात उतरवला आहे.
या निवडणुकी करिता भाजपाने ही कंबर कसली आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्या सोबतच भाकप, शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेड ने देखील उमेदवार रिगणात उतरवून विरोधका समोर तगडे आवाहन उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
येथील सहकार क्षेत्रात ऍड. देविदास काळे यांचा वरचष्मा आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत विदर्भातील प्रथितयश रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेत त्यांनी निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले. नियोजनबद्ध रणनितीचा तो भाग होता, आता वसंत जिनिंग मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत बलाढ्य विरोधकांसमोर नेमकी कोणती व्यूहरचना अवलंबतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वणी: बातमीदार