Home Breaking News राज्य सरकार बरखास्त करा, वंचित आक्रमक

राज्य सरकार बरखास्त करा, वंचित आक्रमक

70

पडसाद महापुरूषांच्या बदनामीचे

रोखठोक | राज्य सरकारमधील संवैधानिकपदावर असलेल्या लोकसेवकांनी महापुरुषांची बदनामी करण्याचे कट कारस्थान रचले आहे. त्यांना सरकार मध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही. तरी राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केली आहे.

मागील काही दिवसापासून महापुरूषांच्या बदनामीचे सत्र सुरू आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अभद्र टिपणी केली होती. तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलही एकेरी भाषेचा वापर करून त्यांचा अपमान केला होता.

नुकतेच राज्याचे उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपमानजनक भाष्य केले. यामुळे महाराष्ट्रातील तमाम बहुजन, शेतकरी, शेतमजूर, मराठा, ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

क्रियेची प्रतिक्रिया उमटतेच, त्याप्रमाणेच समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने आपल्या संतप्त भावना व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाही फेकली. या प्रकरणी त्या कार्यकर्त्यांवर विविध कलमानुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे. हे कायद्याला अनुसरून नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सखोल चौकशी करून संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

महापुरुषांच्या जीवनकार्याबद्दल व त्यांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती प्रसारित करून व त्यांच्याबद्दल अभद्र टिपणी करून त्यांचा अपमान करीत आहे. त्यामुळे सातत्याने होत असलेला अपमान उभा महाराष्ट्र आता सहन करणार नाही. यामुळे तात्काळ राज्य सरकार बरखास्त करावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याप्रसंगी लक्ष्मीकांत लोळगे, मिलिंद पाटील, मंगल तेलंग, दिलीप भोयर, किशोर मुन यांचे नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनावर वैशाली गायकवाड, अर्चना कांबळे, बुधघोष लोणारे, नंदनी ठमके, ललिता तेलतुंबडे, टेकचंद लाभाने, नलिनी थोरात, किर्ती लाभाने, सुभाष परचाके, पुंडलिक मोहितकर, प्रकाश काळे, नानाजी लाळे, अक्षय रामटेके, रोहित डोंगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.
वणी: बातमीदार