● दारूसह सव्वातीन लाखाचा मुद्देमाल जप्त
रोखठोक | निवडणूक काळात दारूचा महापूर वाहतो हे सर्वश्रुत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम राबवली. LCB पथकाने वॉच ठेवला आणि दारू तस्कर गळाला लागले. मंगळवारी पहाटे दारूची खेप रासा येथे आलिशान वाहनातून जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच ड्रीमलॅन्ड सिटी परिसरात सापळा रचला आणि कारवाई फत्ते करण्यात आली. याप्रकरणी अनुद्यप्ती धारकासह तिघांवर गुन्हे नोंद करण्यात आले.
सौरभ किशोर नगराळे (22) राजुर कॉलरी, सचीन दिलीप शेनाङ (55) डोल मच्छींद्रा ता. मारेगांव व अनुद्यप्ती धारक अशोक दुर्गमवार रा.राजुर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विस्तृत वृत्त असे की, गोकुल नगर परिसरातील दुर्गमवार चालवित असलेले देशी दारुचे नियमबाह्य पद्धतीने सुरू असून काही व्यक्ती वाहनातून रासा येथे अवैद्यरीत्या दारू नेणार आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला प्राप्त झाली.
रासा मार्गावरील ड्रीमलॅन्ड सिटी परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री 12: 30 वाजताच्या दरम्यान पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर क्रमांक MH- 29 – AD- 5359 या संशयित वाहनांची झाडाझडती घेण्यात आली असता 27 हजार 360 रुपयांची देशी दारू आढळून आली. यावेळी वाहनातील दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दुकान मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सपोनि अमोल मुडे, पोहवा उल्हास कुरकुटे, पोना महेश नाईक, सुधीर पिदुरकर, राम पोपळघट, चालक पोहवा नरेश राऊत सर्व स्थागुशा यवतमाळ यांनी केली.
वणी : बातमीदार