Home Breaking News आणि….गावातील राजकारणातच गावपुढारी ‘माघारले’

आणि….गावातील राजकारणातच गावपुढारी ‘माघारले’

958
Img 20241016 Wa0023

प्रस्‍थापितांना हादरा, नवख्‍यांना संधी

सुनील पाटील | तालुक्‍यात चांगले प्राबल्य असणाऱ्या नेत्‍यांच्‍या नावाने त्‍यांच्‍या गावाची ओळख आहे. अनेक वर्षापासुन त्‍याच त्‍या प्रस्‍थापितांचा वाजत असलेला डंका यावेळी माञ भुईसपाट झाला आहे. बलाढ्य नेत्यांच्या गावात नवख्‍यांनी बाजी मारल्‍याचे चिञ ग्रामपंचायतीत बघायला मिळाले. गावपातळीवरील राजकारणात गावपुढारी मात्र माघारले आहेत.

चिखलगांव मध्‍ये शिवसेनेच्‍या सुनील कातकडे यांचे वर्चस्‍व आहे. माञ मागील पाच वर्षाच्‍या कालावधीत सैल झालेली पकड पुन्‍हा मिळवण्‍यात त्‍यांना यश आले आहे. विक्रमी मताधिक्‍याने सरपंच पदाचे उमेदवार रुपाली सुनील कातकडे ह्या विजयी झाल्‍या आहेत. कातकडे गटाला खिंडीत पकडण्‍यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. चिखलगांवात भाजपाचे संजय पिंपळशेंडे या प्रस्थापित नेत्‍याचा करिष्‍मा मात्र चालला नाही.

गणेशपुर चे माजी सरपंच तसेच खासदारांचे निकटस्‍थ तेजराज बोढे यांना मतदारांनी नाकारले आहे. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाने दमदार मुसंडी मारली आहे. तर पंचेंवीस वर्षा पासुन वेळाबाई येथे शिवसेनेचे अनिल राजुरकर यांचे असणारे अधिपत्‍य भाजपाने खालसा केले आहे. तालुक्‍यातील मेंढोली गावात अँड. विनायक एकरे व डॉ भाऊराव कावडे हे दोन भारदस्त पुढारी आहेत. ग्रामस्थांनी दोघानाही नकारत काँग्रेसचे पवन एकरे यांच्या गटाला तारले.

सहकार क्षेञात प्रस्‍थ असणारे विठठल झाडे तसेच राजकीय धुरंधर मोरेश्‍वर येरगुडे यांच्‍या कुरई गावात शिवसेनेने बाजी मारली आहे. कम्‍युनिस्‍ट पक्षाचा वरचष्‍मा असलेल्‍या व माकपचे नेते ऍड दिलीप परचाके यांच्‍या रांगणा या गावात भाजपा शिरली आहे. कायर शिवसेनेचा बालेकिल्‍ला म्‍हणुन ओळखल्‍या जातो येथील ग्रामपंचायतीत शिवसेना (ठाकरे गट) बंडखोरानेच सत्‍ता हस्‍तगत केली आहे. एकुनच अनेक धुरंधराचे या निवडणुकीत पाणीपत झाले असुन आ. बोदकुरवार यांनी माञ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा गड असलेल्‍या गावात सुरुंग लावला आहे.
वणी: बातमीदार