● गुन्हा दाखल, तिघे ताब्यात
रोखठोक | पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दोन परिवारात चाललेल्या वादाला शांत करण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी सरसावली होती. त्या कर्तव्यावरील महिला पोलीसाला धक्काबुक्की करण्यात आली होती. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हे नोंद करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवार दि. 27 डिसेंबर ला रात्री करण्यात आली.
शंकर पोन्नलवर (46), योगिता पोन्नलवर (39)रा. तेलीफैल यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात एका विधिसंघर्ष ग्रस्त बालिकेचा सहभाग आहे. विस्तृत माहिती अशी की, तेलीफैल परिसरातील एक मुलगी आपल्या प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती. त्या दोघांनी लग्न केलं आणि काही दिवसांनी ते दोघे थेट पोलीस ठाण्यात पोहचले.
त्या जोडप्यांच्या पाठोपाठ त्यांच्या घरातील मंडळी सुद्धा पोहचली. त्यांच्यात वाद सुरू असल्याने कर्तव्यावर असलेली महिला पोलीस कर्मचारी छाया उमरे यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांसोबत वाद घालू नका म्हणून तिने दोन्ही परिवाराला समजावले.
रागाच्याभरात असलेल्या एका परिवारातील महिलेने धक्काबुक्की करत छाया उमरे यांना खाली पाडले. यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही घटना अतिशय निंदनीय असल्याने व पोलीस ठाण्याच्या प्रांगणात पोलिसांसोबतच हुज्जत घालण्यात आल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वणी: बातमीदार