● वाहन क्रमांकामुळे आला संशय
रोखठोक | यवतमाळ मार्गावरील बाकडे पेट्रोल पंप जवळ छत्तीसगढ राज्यातील पासिंग असलेले व मागे-पुढे वेगळे क्रमांकाच्या संशयास्पद वाहनाबाबत ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांना गोपनीय माहिती मिळाली. ताबडतोब सापळा रचला असता चोरीच्या वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शनिवार दि. 7 जानेवारीला करण्यात आली.
रेनुका उर्फ दिपक साहु (19) व किरण कुमार साहु (19) दोघेही राहणार दौलताबाजार जि. सारंगढ छत्तीसगड असे संशयितांची नावे आहेत. त्यांचे ताब्यात महिंद्रा पिकअप हे 3 लाख 50 हजार रुपये किमतीचे चोरीचे वाहन होते. पुढील बाजूस CG-11-AB- 0887 तर मागील बाजूला CG-11-AB-0886 अशी नंबर प्लेट होती यामुळे संशय बळावला.
गोपनीय माहितगाराने संशयित वाहनाबाबत ठाणेदार शिरस्कार यांना माहिती दिली. ठाणेदारांनी तात्काळ सपोनि माधव शिंदे व पथकाला वाहन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वाहन चालकाची कसून चौकशी केली असता छत्तीसगड राज्यातील सर्विसा पोलीस स्टेशन हद्दीतून 5 जानेवारीला वाहन चोरी गेल्याची व गुन्हा नोंद असल्याची खातरजमा झाली.
पोलिसांनी या प्रकरणी सर्विसा पोलीस स्टेशनला नमुद वाहन व आरोपी ताब्यात घेतल्या बाबतची माहीती देण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, SDPO संजय पुजलवार, पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनि माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, डोमाजी भादीकर, सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिन्द्रकुमार भारती, पुरुषोत्तम डडमल, सागर सिडाम व चालक सुरेश यांनी केली.
वणी : बातमीदार