● सहा महिन्यांपासून कार्यालय अंधारात
● मनसेचे अनोखे आंदोलन
रोखठोक | शहरात पंचायत समितीच्या अधीन येत असलेल्या शिक्षण विभागाचे गटसाधन केंद्र मागील सहा महिन्यांपासून अंधारात आहे. 7 हजार 500 रुपयांचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने सहा महिन्यापूर्वी कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला होता. ही गंभीर बाब मनसे महिला सेनेच्या कार्यकर्त्यांना लक्षात येताच त्यांनी मेणबत्या पेटवत अनोखे आंदोलन केले.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या शिक्षण विभागातील गटसाधन केंद्र अंधाराच्या छायेत आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या अल्का त्रिंबके काही कामानिमित्त कार्यालयात गेल्या असता ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली.
गटसाधन केंद्र कार्यालयातून 223 जिल्हा परिषद शाळेचा कारभार हाताळला जात असून संपूर्ण कर्मचारी मागील सहा महिन्यापासून अंधारातच काम करत आहे. या गंभीर बाबी कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी मेणबत्त्या पेटवत कार्यालयाला प्रकाशझोतात आणले.
मनसेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम- त्रिंबके, जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर कार्यालयाच्या दुर्लक्षितपणा मुळे कमालीच्या संतापल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच संबंधित कार्यालया शेजारी घनदाट झुडपांची वाढ झाली असून, कार्यालय संपूर्णतः जीर्ण अवस्थेत असल्याचे सांगत कार्यालयात शौचालयाची सुद्धा व्यवस्था नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
याप्रसंगी धनंजय त्रिंबके , आजिद शेख, इरफान सिद्दीकी, लक्की सोमकुवर, वैभव पुरानकर सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
वणी: बातमीदार