Home Breaking News वेकोली बाधित क्षेत्रात, रस्त्याला आली ‘अवकळा’

वेकोली बाधित क्षेत्रात, रस्त्याला आली ‘अवकळा’

410

ग्रामस्थ संतप्त, बांधकाम विभागाला निवेदन

रोखठोक | तालुक्यातील लालगुडा, भालर, बेसा, लाठी, निवली, तरोडा या वेकोली बाधित क्षेत्रात येणाऱ्या गावातील रस्त्याची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अवजड वाहनाची वर्दळ, वहन क्षमतेनुसार बांधण्यात न आलेले रस्ते उखडणारचं. वेकोली क्षेत्रात येत असलेल्या अनेक गावात जाण्यासाठी जनतेला, सोबतच कामावर जाणाऱ्या कामगारांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. परिणामी लहानसहान अपघाताचा सामना करावा लागत आहे.

वेकोली बाधितक्षेत्र असतांना वेकोलीचा फंड जातोय कुठे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वेकोली बाधीत क्षेत्रात येत असलेल्या गावातील मूलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी वेकोली प्रशासनाची आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ आपल्या चेले- चपाट्याना पाठबळ देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे.

बाधित क्षेत्रात येत असलेले रस्ते त्वरित डांबरीकरण करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील सरपंच यांनी केली आहे. यापुढे कोणतीही जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार असेल इशारा मनोज ढेंगळे, राहुल खारकर, बबन वाटेकर, सचिन घोंगडे, प्रमोद देवतळे, मनोज बोढे, लोकेश ठावरी यांनी निवेदनातून दिला आहे.
वणी: बातमीदार