● पोलिसांच्या निशाण्यावर ‘ते’ ड्रग्ज शौकिन
रोखठोक | जिल्ह्यातील ड्रग्ज शौकिन महागड्या MD (Synthetic Drugs) या अमली पदार्थाची नशा करतात हे आता उजागर होत आहे. मुंबईतून MD (Mephedrone) नावाचा अंमली पदार्थ पांढरकवडा येथे नेत असलेल्या संशयिताला यवतमाळ बस स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने सोमवार दि. 13 मार्चला केली.
सुहास ज्ञानेश्वर चितकुटलावार हा राणी लक्ष्मीबाई वार्ड पांढरकवडा येथील निवासी आहे. तो मुंबई येथून येत असून MD (Mephedrone) नावाचा अंमली पदार्थ पांढरकवडा येथे घेवून जात असल्याची गोपनीय माहिती LCB पथकाला मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने क्षणाचाही विलंब न करता यवतमाळ बसस्थानक परिसरात सापळा लावला. गोपनीय माहितगाराने दिलेल्या वर्णनाचा तरुण बसस्थानका बाहेरील ऑटो जवळ उभा असलेला दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ 4 ग्राम 7 मिली (Mephedrone) हा अंमली पदार्थ आढळून आला.
पांढरकवडा येथील शौकीनाना हा अमली पदार्थ विकणार होता का ? तसेच ते शौकीन कोण आहे याचा उलगडा होणे गरजेचे आहे. यापूर्वी सुद्धा यवतमाळात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने (LCB) कारवाई करत 1 लाख रुपयांचे MD ड्रग जप्त केले होते. यावेळी ताब्यातील आरोपी जवळून 29 हजार 620 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचेवर अवधुतवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात LCB प्रमुख प्रदीप परदेशी, API अमोल मुडे, सुनिल खंडागळे, सुधिर पिदुरकर, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिष फुके यांनी पार पाडली.
वणी : बातमीदार