● तांदूळ पुरवठ्याचा अभाव
रोखठोक | शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात शाळास्तरावर तांदुळाचा पुरवठा न केल्यामुळे वणी तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये पोषण आहार योजना ठप्प पडली आहे. राज्य शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली होती. मात्र तांदळाचा पुरवठा का ठप्प करण्यात आला हा संशोधनाचा विषय असून पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वर्ग 1 ते 8 व्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नीट पोषण व्हावे या हेतूने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली होती. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सुरवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार प्रत्येक महिन्याला 3 किलो तांदुळाचे तयार पाकीट दिल्या जात होते. त्यानंतर या योजनेत बदल करून खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत दिल्या जात होती. यात पूरक आहार म्हणून केळी, अंडी सुद्धा दिल्या जात होती.
या योजनेत अधिक सुधारणा करून मध्यान्ह भोजन योजना अधिक पोषक करून विविध डाळी, पालेभाज्या या आहारात देणे सुरू झाले. यातून खरोखरच विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत होता. योजनेच्या पुढील टप्प्यात तांदुळासह तूरडाळ, मुंगडाळ, बरबटी, चना, वाटाणा शासनाकडूनच पुरविल्या जाऊ लागल्या. यात व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकाद्वारा किंवा केंद्रीकृत किचन योजनेअंतर्गत काही शहरी भागात कंत्राटदार नेमून एकाच ठिकाणी अन्न शिजवून त्याचे वितरण करण्याची पद्धत सुरू करण्यात आली होती.
शासनाने प्रत्येक शाळेत किती तांदुळाचा साठा शिल्लक आहे याची ऑनलाइन माहिती गोळा केली होती. तरीही पुरेसा धान्य पुरवठा शासनाकडून करण्यात आला नाही. ज्या शाळेचे धान्य संपले आहे त्या शाळेला खुल्या बाजारातून खरेदी करण्याची परवानगी नाही. त्यामुळे धान्य संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पोषण आहार कसा द्यावा या विवंचनेत व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापक आहेत.
विद्यार्थी उपयोगी न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेली योजना धान्याच्या पुरवठ्या अभावी बंद पडली आहे. या गंभीर बाबीची शासनस्तरावर तात्काळ दखल घेऊन धान्यादी साहित्याचा पूरवठा सुरू करावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.
वणी : बातमीदार