● हेल्मेट वापरा बाबत नागरिकांना आवाहन
रोखठोक |मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे शासनाने सक्तीचे केले आहे. मात्र अनेक दुचाकीस्वार गांभीर्याने विचार करत नसल्याने येथील वाहतूक शाखेने गुरुवार दि. 23 मार्चला सकाळी हेल्मेटसह बाईक रॅली काढून जनजागृती केली.
अपघाती मृत्यूंच्या वाढत्या संख्येला हेल्मेट वापराचा अभाव हे देखील एक कारण असल्याने त्याबाबत जनजागृतीची नितांत गरज आहे. पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड व अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम यांनी हेल्मेटसह बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
शासकीय मैदान पाण्याचे टाकीजवळुन “मोटार सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा” यासाठी हेल्मेटसह बाईक रॅली काढण्यात आली. टिळक चौक, शहीद भगतसींग चौक, खाती चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,गांधी चौक, साई मंदिर चौक असे मार्गक्रमण करत रॅलीची सांगता वाहतुक नियंत्रण उपशाखा येथे करण्यात आली.
रॅलीच्या सुरवातीला SDPO संजय पूजलवार यांनी हिरवी झेंडी दाखवली तर रॅलीत मुस्कान शेख यांच्या नेतृत्वात TDRF पथक, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे NCC प्रमुख प्रा. किसन घोगरे व विद्यार्थी, NSS प्रमुख प्रा. नीलिमा दवणे व पथक, दिनानाथ आत्राम, सुशगंगा पॉलीटेक्नीकचे विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.
आयोजित रॅलीत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार व वाहतूक निरीक्षक संजय आत्राम यांनी “मोटार सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा” असे आवाहन केले. यावेळी वाहतूक शाखेचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
वणी : बातमीदार