● अभुतपुर्व शोभायाञा, रामनवमी उत्सव जल्लोषात
रोखठोक | संपुर्ण देशात रामनवमीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला त्याप्रमाणेच वणी शहरात अभुतपुर्व शोभायाञा काढण्यात आली. पारंपारिक वाद्य, ढोलताशांचा गजर, वारकरी मंडळीचे भजन, भारदस्त हनुमानजी आणि नयनरम्य देखावे प्रमुख आकर्षण ठरले. जय श्रीरामाच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले.
शोभायाञा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सुरु झाली जुन्या स्टेट बँकेजवळील राम मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राम,लक्ष्मण, सीता यांचे जिवंत देखावे पहावयास मिळाले. तर हनुमानाचे अनोखे प्रदर्शन पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला होता. रंगीबेरंगी रोशनाई, फटाक्यांची आतिषबाजी व डिजे च्या तालावर “एक ही नारा, एक ही नाम.. जय श्री राम जय श्री राम”… च्या गजरात तरुणाई थिरकत होती.
शोभायात्रेत शेगांव येथुन आलेल्या भजन मंडळांनी उपस्थित दर्शविली होती. त्यांच्या भजनाने संपूर्ण शहर राममय होऊन गेले. तालासुरात नाचणाऱ्या अश्वानी सर्वांचे लक्ष वेधले होते. शोभायात्रा ही राम मंदिर ते शाम टॉकीज, भारत माता चौक, दीपक टॉकीज, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, टुटी कमान चौक, गांधी चौक, खाती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक तेथून राम मंदीरात या भव्य शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
शहरातील प्रत्येक चौकात गुलाबाच्या पाकळ्यांनी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. टागौर चौक येथे चंदर फेरवाणी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेचे नेते राजु उंबरकर, टिळक चौकात रज्जाक पठाण यांच्या सह मुस्लिम बांधवांनी देखील श्री राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांचा सत्कार केला. तर स्नेहा स्विट मार्केट या बिल्डिंग वरुन गुलाबाच्या पाकळ्यांचा मिरवणुकीवर वर्षाव करण्यात आला.
शोभायात्रेत स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे नेते राजु उंबरकर, कळंब देवस्थानचे अध्यक्ष संतोष कुचनकर, तहसीलदार निखिल धुळधर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदिप शिरस्कर, किरण बुजोने, कुंतलेश्वर तुरविले, मनोज सरमोकदम, नितीन शिरभाते, दिपक नवले, राजाभाऊ पाथ्रडकर, राजाभाऊ बिलोरीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयोजीत शोभायाञेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड, बॉम्ब शोधक व नाशक पथक शहरात तैनात करण्यात आले होते. या शोभायात्रेकरिता श्री रामनवमी उत्सव समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार