Home वणी परिसर 7 दिवसाचा अल्टीमेटम…जीवघेणा रस्ता दुरुस्त करा

7 दिवसाचा अल्टीमेटम…जीवघेणा रस्ता दुरुस्त करा

420

गणेशपूर येथील नागरिक त्रस्त

रोखठोक | गणेशपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर 2 मधील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा रस्ता बंद करावा लागेल असा इशारा छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने ग्रामपंचायत व पंचायत समितीला निवेदनातून दिला आहे.

निवेदन देतांना ग्रामस्थ

वणी – मुकुटबन मार्गावरून गावात येणारा व रहदारीचा रस्ता आहे. रस्त्याची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे. लहानसहान अपघात नित्याचेच असून जीवितहानीची शक्यता निवेदनातून वर्तवण्यात आली आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती बाबत स्थानिक नागरिकांनी ग्राम पंचायतीला वारंवार सूचना दिल्या आहेत.

छत्रपती महोत्सव समिती व स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे नूतनीकरण करून सिमेंट काँक्रीट च्या रस्त्याचे निर्माण करावे अशी मागणी केली आहे. त्या प्रमाणेच यामार्गावर अपघात अथवा जीवितहानी झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार असेल असे नमूद करण्यात आले आहे.

सोमवारी ग्रामस्थांनी संबंधित विभागाला निवेदन दिले आहे. सात दिवसाच्या आत रस्ता बांधकाम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तो रस्ता नागरिक स्वतः च बंद करतील असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी विवेक ठाकरे, गणेश काकडे, प्रशांत काळे , भगवान मोहिते, विकास पेंदोर, दीपक मालेकर, संतोष गुगुल, गौरव काळे, सुभाष मोते, श्रीतेश धुरातकर, स्वप्नील थेरे, पिंटू काळे, तेजस मडावी व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
वणी: बातमीदार