● ग्रामपंचायत सदस्य मारहाण प्रकरण
Wani News | तालुक्यातील पुनवट ग्रामपंचायतीत मासिक सभेत एका विषयावरील चर्चे दरम्यान वाद झाला. सरपंच यांनी यावेळी पतीला फोन करून बोलावून घेतले असता त्यांनी ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केली. याप्रकरणी चौकशीअंती विभागीय आयुक्तांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रफिती च्या आधारे सरपंच यांना अपात्र घोषित केले आहे. The sarpanch has been declared disqualified on the basis of the CCTV footage.
पुनवट ग्रामपंचायतीत 19 सप्टेंबर 2022 ला मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष टेंभूर्डे यांनी वॉर्ड क्रमांक 1 व 2 मधील विषयावर सरपंच पौर्णिमा संदीप राजूरकर यांना विचारणा केली असता वाद निर्माण झाला. सरपंचांनी फोन करून पतीला ग्रामपंचायतीत बोलावले.
संदीप राजूरकर यांनी थेट ग्रामपंचायत गाठून सदस्य संतोष टेंभूर्डे याला बेदम मारहाण केली असा आरोप दाखल तक्रारीत करण्यात आला होता. याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून विस्तृत अहवाल सादर करण्यात आला.
मासिक सभेच्या वेळी सात सदस्य उपस्थित होते तर काही सदस्य निघून गेले होते. चौकशी दरम्यान काही ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेच्या वेळी अशी घटना घडलीच नाही असे बायन नोंदवले. मात्र ग्रामपंचायतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडलेली घटना कैद झाली होती.
पुनवट ग्रामपंचायतीत घडलेल्या घटनेची विस्तृत चौकशी केल्यानंतर विभागीय आयुक्त अमरावती यांनी पौर्णिमा संदिप राजुरकर सरपंच ग्रामपंचायत पुनवट यांना अपात्र ठरवले आहे. त्यांनी कर्तव्यात कसुर तथा गैरवर्तणुक केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 चे कलम 39 (1) मधील तरतुदीनुसार त्यांना सदस्य तथा सरपंच ग्रामपंचायत पुनवट या पदाकरीता अपात्र घोषित केल्याचा आदेश दिनांक 12 सप्टेंबर 2023 ला निर्गमित केला.
Rokhthok News