● ग्रामपंचायतीत बोकाळला गैरकारभार…!
● सदस्यांनी सखोल चौकशीची केली होती मागणी
Wani News | तालुक्यातील पळसोनी गट ग्रामपंचायत झरपट येथील सदस्यांनी बोकाळलेल्या गैरकारभाराविरोधात गटविकास अधिकारी, पंचायत समीती वणी यांचेकडे रीतसर तक्रार केली होती. सहा दिवसात तक्रारींचे निवारण करावे अन्यथा सामूहिक राजीनामा देण्यात येईल असा इशारा दिला होता. अखेर मंगळवार दिनांक 30 जुलै ला 9 पैकी 5 सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने ग्रामपंचायतीची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे. The members had duly complained to the Group Development Officer, Panchayat Samiti Wani against the alleged maladministration.
पळसोनी गट ग्रामपंचायत झरपट येथील विजय भट, बंडू खंडाळकर, सीमा मालेकर, जयमाला टेकाम व रंजना ठमके या ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला आहे. 1 जुलैला गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीत चाललेल्या अनागोंदीचा पाढा तक्रारीत नमूद करण्यात आला होता. सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती.
सदस्यांनी तक्रारीत केलेल्या आरोपाचे साधे खंडन करण्याची तसदी पंचायत समितीने घेतली नाही. तक्रारीत विविध गंभीरस्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. यात वॉटर एटीएम मधील 50 कॅन परस्पर विक्री केल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत यांना मिळणारा पाणी कर, अकृषक कर, घर आकारणी कर सामान्य फंड हिशोब इत्यादी सर्व कर वसुल करुन लाखो रुपयाची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला होता.
सरपंच, उपसरपंच व सचिव यांना आर्थिक व्यवहाराची विचारणा केल्यास अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे तक्रारीतून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीत चाललेल्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासन ढिम्म असल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही यामुळे अखेर ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली असून राजीनामे मंजूर होतात का हे बघणे औत्सुक्याचे आहे.
Rokhthok News