● संपुर्ण राज्यात एकदिवसीय आंदोलन
Wani News | राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाच्या विरोधात आपल्या न्यायहक्कांसाठी बुधवार दिनांक 25 सप्टेंबरला एकदिवसीय आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना यवतमाळचे जिल्हा सचिव आनंद शेंडे यांनी “शिक्षक बांधवांनो जागृत व्हा, आंदोलनात सहभागी व्हा” असे आवाहन केले आहे. One-day protest of teachers unions against the government on September 25
दिर्घ काळ चाललेल्या या संघर्षाच्या चळवळीला तेजोमय करण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात संपुर्ण राज्यात एकदिवसीय भव्य आंदोलन आयोजित केले आहे. याप्रसंगी किरकोळ रजा घेऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनकर्त्यांना जाणीव व्हावी या करिता शिक्षक बांधवांनी जागृत होणे गरजेचे आहे.
गोरगरिबांच्या लेकरांचे शिक्षण हिरावण्यासाठी शासन सज्ज झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. जिल्हा परिषद शाळेची अवस्था बिकट झालेली आहे. शासनाच्या तिजोरीत पैसा नाही हे कारण पुढे करत शिक्षण सेवक योजना आणली. ती मानगुटीवरून उतरायला तयार नाही. तसेच त्यानंतर 2005 ला पेन्शन नाकारली. प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकच हद्दपार करण्याचा शासनाने पवित्रा घेतला की काय हे कळायला मार्ग नाही.
शासन 10 ते 15 हजारात अप्रशिक्षित शिक्षकांची फौज तयार करून जि.प.शाळा बंद करण्याचे नियोजन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कृत्याला कडाडून विरोध करणे हे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरचेचे आहे. अन्यथा शिक्षण सेवक योजना, पेन्शन नाही, कंत्राटी शिक्षक, पुढे लहान शाळा बंद होणार, हे सत्य नाकारता येणार नाही.
शिक्षक निश्चितीचे अन्यायकारक निकष असलेला दि.15 मार्च 2024 शासन निर्णय रद्द झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. WhatsApp Group वरून येणारे कोणतेही आदेश स्विकारणार नसल्याचे नमूद करत, Online कोणतीही माहिती देणार नसल्याचे निवेदनातुन ठणकावले आहे.
शिक्षक व विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या लढ्यात स्वयंस्फूर्तीने सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. शतप्रतिशत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी मोर्चाला उपस्थिती दर्शवावी, न्याय मिळेपर्यत काळी फीत लावून विरोध करावा, शिक्षक एकजुटीची ताकद दाखविण्याची हीच वेळ असल्याने आंदोलनात सहभागी व्हावे असे आनंदकुमार शेंडे यांनी आवाहन केले आहे.
Rokhthok News