● कंपनीविरोधात संजय खाडे आक्रमक
● 27 जानेवारीपासून कामगारांचे आमरण उपोषण
Wani News | एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. या कंपनीची मनमानी शिगेला पोहचली आहे. कंपनीत काम करणा-या तब्बल 65 कामगारांना अचानक कामावरून काढले. कंपनीच्या या भूमिकेवर कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी कामगारांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला आहे. तर 27 जानेवारीपासून कामगार आमरण उपोषण करणार आहेत. As many as 65 workers working in the company were suddenly fired.
कंपनीच्या तुघलकी धोरणाचा फटका कामगारांना बसला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व कामगारांना पुन्हा कामावर रुजू करावे, या मागणीसाठी कामगारांनी कंपनीविरोधात एल्गार पुकारला आहे. कंपनीच्या गेटसमोर कामगार सहकुटुंब आमरण उपोषण करणार आहेत. याबाबत कामगारांनी उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला याबाबत निवेदन दिले आहे.
एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. ही कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी. उत्खननाचे काम करते. गेल्या 5 वर्षांपासून या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर सुरु आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याने भूमीपुत्रावर अन्याय झाल्याचे स्पष्ट होत आहे.
● हा भूमिपुत्रांवर अन्याय ●
वेकोलिसाठी स्थानिकांनी आपली जमीन दिली. शेती गेल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व अनेक स्थानिकांचा रोजगार गेला. वेकोलिमुळे होणा-या प्रदूषणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रदूषणाचा स्थानिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. वेकोलिच्या प्रगतीत भूमिपुत्रांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र वेकोलिसाठी काम करणा-या कंपन्या आता भूमिपुत्रांच्याच जिवावर उठल्या आहेत. हा भूमिपुत्रावरचा अन्याय सहन केला जाणार नाही. कंपनीने तात्काळ कामगारांना नोकरीवर रुजू करावे.
संजय खाडे
वेकोलि टीएससी मेंबर
निवेदनावर प्रभाकर खोब्रागडे, संजय पारशिवे, कान्हू तामगाडगे, महेश गोवरदिपे, अनिल डोंगे, योगेश कामतवार, प्रकाश इंगोले, सुरेश पारशिवे, वासुदेव चिडे, किसन खेडेकर, अरुण डाहूले, प्रवीण कातरकर, श्रीकांत निंदेकर, संजय व-हाटे, प्रकाश नागोसे, रवि गुरनुले, संदीप नांदे, संजय वासनकर, आकाश गोबाडे, तुळशीदास धांडे, सुनील कातरकर, विजय खुटेमाटे, दिलिप काकडे, गणेश सातपुते, भाऊराव काकडे, मिथून निब्रड, विशाल गोवारदिपे, पुरुषोत्तम पाचभाई, राजू ढपकर, वैभव खाडे, हरिभाऊ खेडेकर, संतोष राजूकर, अनिल बोबडे, अरुण असिनकर, दीपक खुसपुरे, सुभाष पिंगे, गणेश पारशिवे, मंगेश देरकर आदींनी स्वाक्षरी केली आहे.
Rokhthok News