Home वणी परिसर विध्यार्थ्यांनी राबविली लसीकरण जनजागृती मोहीम

विध्यार्थ्यांनी राबविली लसीकरण जनजागृती मोहीम

134
लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा उपक्रम

वणी :- गेल्या दीडवर्षभरापासून संपूर्ण जगाला त्रस्त करणार्‍या covid-19 या भीषण समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने लसीकरणाची प्रचंड मोठी मोहीम हाती घेतली.

प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण झालेच पाहिजे या सरकारी धोरणाला प्रत्यक्षात राबवताना असंख्य हातांची आवश्यकता होती. जनसामान्यांना यातील प्राधान्याने ऑनलाइन होणाऱ्या गोष्टी सहज समजत नसल्याने, येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी, सामाजिक दायित्वाची जाण बाळगत वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायन शास्त्र विभागाने एक अत्यंत उपयुक्त अशी जनजागृतीची मोहीम राबवली.

या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या बीएस्सी प्रथम वर्षाच्या 82 द्वितीय वर्षाच्या 97 आणि अंतिम वर्षाच्या 68 अशा एकूण 247 विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात आणि शक्य तेथे जाऊन प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगत जनजागृती करून त्या संबंधित व्यक्तींना लसीकरण केंद्रापर्यंत नेऊन, तेथील प्रक्रिया पूर्ण करून, शेवटी त्या त्या व्यक्तीचे लसीकरण प्रमाणपत्र तयार करून त्या व्यक्तीला देण्यापर्यंत प्रत्येक कार्य नेटाने पूर्ण केले.

या प्रकल्पात सहभागी झालेल्या आरती शामराव झिलपे (190 व्यक्तींचे लसीकरणास सहकार्य ) धनश्री बबन अवताडे (152) तर श्रीकांत उमेश गेडाम ( 145) या सर्वाधिक कृतिशील विद्यार्थ्यांसह सगळ्यांनी मिळून अक्षरशः हजारो लोकांचे लसीकरण सुसंबद्ध पद्धतीने संपन्न केले.या तीन विद्यार्थ्यांसह सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

या संपूर्ण उपक्रमाची कल्पना मांडणाऱ्या आणि जबाबदारी घेऊन हा उपक्रम सफल करणाऱ्या महाविद्यालयाच्या रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा आस्वले यांनी सर्वाधिक व्यक्तींना प्रोत्साहित करणाऱ्या आरती शामराव झिलपे या विद्यार्थिनीला व्यक्तिशः 1001 रुपयाचे आणि दुसर्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील विद्यार्थ्यास प्रत्येकी 501 रुपयाचे बक्षीस वितरीत केले. लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या या सामाजिक दायित्वा बद्दल आणि अत्यंत आवश्यक अशा उपक्रमाबद्दल वणी येथील विविध मान्यवर व्यक्ती तथा सामाजिक संस्थांच्या द्वारे उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.