Home क्राईम मामाच्या उपकाराची जाणीव आणि हत्येचा उलगडा

मामाच्या उपकाराची जाणीव आणि हत्येचा उलगडा

1249
C1 20240404 14205351

घटनेचे गुढ उकलण्याचा ‘आनंद’ अकल्पनिय

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचले षडयंत्र

प्रियकराच्या प्रेमाखातर पत्नीच पतीला संपविण्याचा डाव आखते तेव्हा सर्व मर्यादा लांघून रचलेले षडयंत्र उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असते. आत्महत्येचा बनाव ते हत्येचे गुढ उकलण्याचा ‘आनंद’ अकल्पनिय. पोलिसांच्या बाजीरावाला फाटा देणाऱ्या प्रियकराला भावनेचे “व्हॅक्सीन” देताच ढसाढसा हंबरडा फोडत गुन्हा काबुल करण्यास भाग पडणाऱ्या वणी पोलिसांचे कौतुक करावे ते थोडेच.

वणी तालुक्यातील रासा या लहानश्या गावातील मृतक ‘निलेश’ चे लग्न मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे वास्तव्यास असलेल्या ‘सपना’ सोबत झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरु असताना अनैतिकतेचे ग्रहण लागले. निलेश ची पत्नी सपनाचे सूत मृतकाचा मेव्हना चंद्रशेखर दुर्गे सोबत जुळले. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, नाते संबंधाचे भान विसरले.

मृतक निलेश च्या वडिलांनी भाचा चंद्रशेखर ला लहानपणीच आपल्या रासा या गावी आणले. त्यांचेवर पुत्रवत प्रेम केले, लहानाचं मोठं केलं. व्यवसाय लावून दिला, लग्न करून देत संसाराची जबाबदारी सोपवली. मात्र गिधाड ते गिधाडच त्याने आपल्याच मामेभावाच्या सुखी संसाराचे लचके तोडले.

निलेशची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पर्यंत पोहचण्याकरिता पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागले. हत्या की आत्महत्या याचा गुंता सोडवताना अनेक पर्याय पोलिसांना शोधावे लागले. तांत्रिक तथा परिस्थितीजन्य पुरावा अपर्याप्त असल्याने पोलिसांनी मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेतला.

निलेशची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. मात्र मृतकाच्या घरच्या मंडळींचा संशय आणि पोलिसांची बेरकी नजर हत्येच्या दिशेनेच तपासात गुंतली. पती,पत्नी आणि तो यावर तपास केंद्रित करण्यात आला. सलग 4 ते 5 दिवस प्रियकर चंद्रशेखर ला चौकशी करिता बोलावण्यात आले. बाजीरावाचा सणसणीत प्रसाद दिला तरी गुन्ह्याची कबुली देत नव्हता.   अखेर मामा भाच्याचे प्रेम, मामाचे उपकार याची आठवण करून देत भावनेचे ‘व्हॅक्सीन’ देताच ढसाढसा हंबरडा फोडत गुन्हा काबुल केला.

रासा येथील 30 वर्षीय निलेश सुधाकर चौधरी याचा मृतदेह 29 ऑगस्ट ला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला होता. तब्बल 15 दिवसानंतर एक-एक रहस्याचा उलगडा करत पोलिसांनी आरोपींना जाळ्यात ओढले. मात्र पत्नीनेच ‘निलेश’ च्या हत्येचा कट रचल्याची बाब तपासात उघड झाली. याप्रकरणी एक विधीसंघर्ष बालकासह 6 जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. कौशल्यपूर्ण तपास करताना घटनेचे गुढ उकलण्याचा ‘आनंद’ अकल्पनिय.