Home वणी परिसर ‘त्या ‘ वादग्रस्त टॉवर चे बांधकाम बेकायदेशीर

‘त्या ‘ वादग्रस्त टॉवर चे बांधकाम बेकायदेशीर

तहसीलदारांचा गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल 

वणी बातमीदार: शहराला लागूनच असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरिया लेआऊट मध्ये उभारत असलेल्या मोबाईल टॉवर ला नागरिकांनी विरोध दर्शविला होता. विस्तृत चौकशीअंती तहसीलदार यांनी मोबाईल टॉवर चे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अहवालातून स्पष्ट होत असल्याने आता हे टॉवरच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहे

गणेशपुर येथील छोरीया लेआऊट परिसरातील जलतरण तलावाजवळ ग्रामपंचायतीच्या जागेवर नवीनतम मोबाईल टॉवर चे बांधकाम होत आहे. याला परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. मोबाईल टॉवरमुळे शास्त्रीय कारणासह शारीरिकदृष्ट्या विपरित परिणाम होण्याची भीती स्थनिकाना सतावत आहे. मोबाईल टॉवर मधून पसरणाऱ्या रेडिएशनमुळे विविध आजाराला आपसूकच आमंत्रण मिळणार असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोबाईल टॉवर उभारू नये अन्यथा उपोषणासह न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.

स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध केल्यामुळेच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रभारी तहसीलदार विवेक पांडे यांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांना तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच ग्रामपंचायत गणेशपूर सचिव यांचे कडून देखील अहवाल मागविण्यात आला होता. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी 10 ऑगस्ट ला तर ग्रामपंचायतीने 12 ऑगस्ट ला अहवाल सादर केला होता. या दोन्ही अहवाला वरून मोबाईल टॉवर उभारणी करीत असलेल्या जागेची वाणिज्य अकृषक परवानगी नसल्याचे दिसून आले.

Img 20250103 Wa0009

वाणिज्य अकृषक परवानगी न घेता कोणतेही वाणिज्य उपयोगा करिता बांधकाम करणे अथवा स्ट्रक्चर उभारणे बेकायदेशीर असल्याचे तहसीलदार विवेक पांडे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आल्याने हे मोबाईल टॉवर वादात सापडले आहे. त्याच बरोबर आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून प्रस्तुत प्रकरणात कोणतेही अवैध बांधकाम होत असल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील अनुषंगीक तरतुदी नुसार कार्यवाही करणेबाबत आपल्या यंत्रणेला निर्देश द्यावे असे सुचवले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर विषय प्राधान्याने निकाली काढून तसा अहवाल कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे