* शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मारेगाव : दीपक डोहणे- मारेगाव पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या दफ्तर दिरंगाईचा फटका आठ महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या शिक्षकाला बसतो आहे.आर्थिक अडचणींचा प्रचंड त्रास सहन करणाऱ्या या शिक्षकावर शिक्षण विभागाने असह्य ताण लादला आहे. चक्क..8 महिन्यापासून रखडले सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
पंचायत समिती अंतर्गत येथील शिक्षक नंदकिशोर ताडूलवार हे मागील जानेवारी मध्ये सेवानिवृत्त झाले. तब्बल आठ महिने लोटूनही त्यांचे सेवानिवृत्ती वेतानासह इतर ‘क्लेम’ मिळण्यास पंचायत समिती शिक्षण विभाग कमालीची दिरंगाई करत असल्याचा आरोप सेवानिवृत्त शिक्षकाने केला आहे. दरम्यान या प्रकाराने आर्थिकदृष्ट्या कुटुंबाला जबर फटका बसत आहे. आजतागायत सेवापुस्तिका सेवेत असतांना पडताळणी करीता यवतमाळ जिल्हा परिषद येथे पाठविण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे आर्थिक सह शिक्षण विभागाच्या बोथट कार्यप्रणालीचा फटका बसून प्रतिकुल परिस्थितीला सामोर जावे लागत आहे.
पिडीत सेवानिवृत्त शिक्षक आपल्या हक्काच्या निवृत्ती वेतन व इतर ‘क्लेम’ साठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे उंबरठे गेल्या सात महिन्यापासून झिजवत असतांना शिक्षण विभाग टोलवाटोलवी करीत आहे. या महिन्या अखेरीस वेतन न मिळाल्यास पंचायत समिती समोर उपोषणाचा मार्ग अवलंबिण्याचा सेवानिवृत्त शिक्षकाने गर्भित इशारा दिला असून मारेगाव तालुका कास्ट्राइब संघटना रस्त्यावर उतरण्यासाठी लवकरच वरिष्ठांना निवेदन देणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष धर्मराज सातपुते यांनी दिली.