● उंबरकरांनी मांडल्या ग्रामीण रुग्णालयातील व्यथा
वणी: विविध समस्येने ग्रासलेल्या ग्रामीण रुग्णालयातील व्यथेचे निराकरण व्हावे या करिता गुरुवार दि.23 सप्टेंबर ला आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी अचानक भेट दिली. याप्रसंगी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी ग्रामीण रुग्णालयातील व्यथा मांडल्या तर नजरेत भरणारा अनागोंदी कारभार बघता अधिकाऱ्यांवर चांगलेच “संतापले”.
ग्रामीण रुग्णालयाला गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचे ग्रहण लागले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रस्तावाला मंजुरात मिळाली असतांना येथे सोयीसुविधांचा अभाव आहे. रुग्णांची गैरसोय ही बाब नित्याचीच झाली आहे. निधी उपलब्ध असतांना साहित्य खरेदी करण्यात येत नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान बाहेरून सीझर किट खरेदी करावी लागत आहे. त्याप्रमाणेच ट्रामा केअर युनिट मध्ये दोन डॉक्टरांची नियुक्ती असतांना ते सतत गैरहजर राहत असल्याचे मनसेचे राजू उंबरकर यांनी निदर्शनास आणून देताच आरोग्य सेवा उपसंचालक अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले.
डॉक्टरांनी मुख्यालयी राहावे अशा सूचना उपसंचलकांनी केल्या. तसेच 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाकरिता बांधकाम विभागाशी संपर्क साधून बांधकामांचे अंदाजपत्रक मागितले. यासोबतच परिसरात सदनिका निर्माण करणार असल्याचे सांगितले. तर भुलतज्ञ डॉ.माधुरी कांबळे यांची ग्रामीण रुग्णालयाकरीता नियुक्ती करण्यात येईल असे मनसेला आश्वस्त केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. धर्मेंद्र सुलभेवार तसेच डॉ.आवारी उपस्थित होते.





