● कोलगाव येथील घटना
● रेस्क्यू टीम राबवणार शोधमोहीम
तालुक्यातील कोलगाव येथे वास्तव्यास असलेला 24 वर्षीय तरुण मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान पैनगंगा नदीवर अंघोळीला गेला होता. तो नदीपात्रात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शीं व ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो आढळून आला नाही. या बाबत प्रशासनाला सूचित करण्यात आले असून आज रेस्क्यू टीम शोधमोहीम राबवणार आहे.
जीवन प्रेम बहादुर दिनार (24) हा कोलगाव येथील निवासी आहे. घटनेच्या दिवशी तो गावालगत असलेल्या पैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेला होता. तो नेहमीच नदीवर अंघोळ करीत असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी तो नदीत उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने घात झाला.
पैनगंगा नदीत रेती माफियांनी रेतीचे उत्खनन केल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही त्यातच तो पोहण्यात तरबेज नव्हता. दुपारी जीवन वाहून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत शोधण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी महसूल व पोलिसांना सूचित करण्यात आले होते. तहसीलदारांनी जिल्हा शोध व बचाव पथकाला पाचारण केले असून बुधवार दि. 27 ऑक्टोबरला रेस्क्यू टीम दाखल होत असून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार