● रुग्णालय परिसरात घडलेल्या घटनेने विद्यार्थी संतप्त
● विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
यवतमाळ शहरात जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिसरात शिकाऊ डॉक्टर ची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. बुधवार दि.10 नोव्हेंबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने कमालीची खळबळ उडाली असून विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

अशोक पाल असे मृतक शिकाऊ डॉक्टर चे नाव आहे तो ठाणे येथील निवासी असून तो जिल्हा शासकीय रुग्णालयात MBBS मध्ये तृतीय वर्षात शिकत होता. रुग्णालय परिसरातच अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने त्यांचेवर सपासप वार केले.
बुधवारी रात्री 8-30 ते 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. डॉ. अशोक पाल हा जिल्हा रुग्णालय परिसरातून जात असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांना वाटेत अडवून धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिक व डॉक्टरांनी त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
उपचारादरम्यान डॉ. अशोक पाल यांचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णालयातील परिविक्षाधीन डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालय प्रशासन, पोलिस प्रशासन यांचे विरुद्ध घोषणाबाजी करत असुरक्षिततेची भावना व्यक्त केली.डॉक्टर पाल यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी रेटून धरत ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खाडेराव धरणे, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, पोलीस कर्मचारी अन्सार बेग, बबलू चव्हाण यांच्यासह पोलीस अधीकारी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
●पोलीस अधीक्षक रुग्णालयात दाखल●
घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी परिविक्षाधीन डॉक्टरनी पोलीस प्रशासना विरुद्ध नारेबाजी केली. पोलीस प्रशासनाने मारेकऱ्यांची शोधमोहीम सुरू केली आहे.
यवतमाळ: बातमीदार