● खाजगी लॅब मध्ये केली तपासणी
शहरातील विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचे लक्षण दिसत होते. त्याने रविवार दि. 5 डिसेंबर ला येथील खाजगी लॅब मध्ये तपासणी केली असता अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. शहरात सातत्याने आढळणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसारताच नागरिक बिनधास्त झाले होते. कोविड त्रिसूत्रीचे पालन पूर्णतः विसरले आणि दबा धरून बसलेल्या कोरोनाने डाव साधला. मागील महिन्यात 12 नोव्हेंबर ला दोन तर 27 नोव्हेंबर ला यवतमाळ ला तपासणी करणारे वणीतील दोन असे चार रुग्ण निष्पन्न झाले होते.
ऑगस्ट महिन्यानंतर कोरोनाचा एकही रुग्ण शहरात तसेच तालुक्यात आढळला नाही. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला होता मात्र सतर्क राहून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन नागरिकांना करत होते.
कोरोनाचा विळखा सम्पूष्टात आल्याचे ग्राह्य धरून नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करणे सोडून दिले होते. बिनधास्त वावरणाऱ्यांची भाऊगर्दी बाजारात दिसायला लागली. व्यावसायिक देखील कोविड नियमांचे पालन तंतोतंत करताना दिसत नाही.
प्रशासन तिसऱ्या लाटेचे भाकीत करत असतानाच “ओमायक्रोन” नामक व्हेरीअंट देशात तसेच राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. सर्वत्र दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
वणी शहरात आढळणारे रुग्ण नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. कोविड त्रिसूत्रीचे पालन काटेकोरपणे व्हावे याकरिता प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. त्याप्रमाणेच नागरीकांनी सुध्दा सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.
वणी: बातमीदार





