● पोलिसांना करावा लागेल कौशल्यपूर्ण तपास
कोरंबी मारेगांव येथे वास्तव्यास असलेला व येथील प्रख्यात पतसंस्थेतील कर्मचारी 7 दिवसापासून बेपत्ता होता. सोमवार दि. 13 डिसेंबर ला त्याचा मृतदेहच मारेगांव येथील जनता विद्यालयाच्या परिसरातील एका शेतात आढळल्याने चांगलीच खळबळ माजली असून आत्महत्या की हत्या हा गुंता पोलिसांना शोधावा लागणार आहे.
संतोष वसंतराव काळे (35) कोरंबी मारेगांव निवासी तरूण वणी येथील रंगनाथ स्वामी पतसंस्थेत मागील 10 वर्षापासून नोकरीला होता. 7 डिसेंबर ला तो पतसंस्थेतील वसूली कर्मचा-यांसह रासा येथे कर्ज वसूलीसाठी गेला होता.
आपले पतसंस्थेचे काम आटोपून तो घरी गेला होता. वणीवरून समान आणायला जात असल्याचे त्याने पत्नीला सांगितले आणि दुचाकीने निघून गेला. रात्र झाली तरी तो परतला नाही, त्याच्या पत्नीने त्याला कॉल केला मात्र मोबाईल बंदावस्थेत असल्याने तो कुठे आहे हे कळत नव्हते. यामुळे घरची मंडळी काळजीत पडली.
संतोषची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर त्याची दुचाकी एका शेताजवळ आढळली होती. संतोषचे वडील वसंतराव काळे यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीसांत दिली होती.
संतोषचे कुटुंबीय, मित्रमंडळी व पोलीस आपल्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवत होते. परंतू त्याचा सुगावा लागत नव्हता. 7 दिवसापासून बेपत्ता संतोषचा कुजलेल्या अवस्थेत शेतात मृतदेह आढळला. घरच्या मंडळींनी सुध्दा त्याला ओळखण्यास असमर्थता दर्शवली मात्र खिशातील ओळ्खपत्राने मृतदेह संतोषचा असल्याचे स्पष्ट झाले.
सात दिवसापासून बेपत्ता संतोष ने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबतचा गुंता शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनाच सोडवावा लागणार आहे. घटनेच्या मुळात जाऊन कौशल्यपूर्ण तपास केल्यास सत्यता उजागर होणार आहे.
वणी: बातमीदार