● प्रेयसीने भाटव्याच्या मदतीने केला ‘गेम’
वणी: राजूर येथील चूनाभट्टीवर कार्यरत असलेल्या 40 वर्षीय इसमाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. परिस्थितीजन्य पुरावा व घटनास्थळावरील निरीक्षणावरून पोलिसांनी हत्त्येचा गुन्हा दाखल केला होता. कौशल्यपूर्ण तपास करून पोलिसांनी हत्त्येचा छडा लावला असून प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीनेच गेम केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अतुल सहदेव खोब्रागडे (40) असे मृतकाचे नाव असून तो राजूर कॉलरीतील निवासी आहे. एका चूनाभट्टी वर तो कार्यरत होता. कामगारांना वेतन वाटपाचे काम तो करायचा. सोमवारी सकाळी चूनाभट्टी परिसरातील एका कामगारांच्या घरालगत संशयास्पदरित्या त्याचा मृतदेह आढळला होता.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला दरम्यान अतुल च्या पायातील बुटाची स्थिती बदलली होती. त्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास आरंभला होता.
चूनाभट्टीवर काम करणारी सोनू राजू सरवणे (25) या महिले सोबत अतुलचे संबंध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
सोनू राजू सरवणे हिने आपला भाटवा हर्षद अंबादास जाधव (45) यांच्या मदतीने अतुलचा गळा आवळून हत्या केली. याबाबत संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या बाहेर आणून टाकला होता.
पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करून आरोपीना जेरबंद केले आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे यांनी कारवाई केली.
वणी: बातमीदार