Home Breaking News जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने “खळबळ”

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने “खळबळ”

● 4 निलंबित तर 19 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘शोकॉज’

वणी: वणी पोलीस स्टेशन हद्दीत शनिवार दि. 29 जानेवारीला आयजी च्या पथकांनी चार मटका अड्डे व दोन प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांवर धाडसत्र अवलंबले होते. या कारवाईत केवळ नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कठोर निर्णय घेत चार निलंबित तर 19 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘शोकॉज’ बाजावल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईत डीबी पथक प्रमुख सुदर्शन वानोळे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर व SDPO पथकातील इकबाल शेख यांना निलंबित करण्यात आले आहे. तर 19 पोलीस कर्मचाऱ्यांना ‘शोकॉज’ देत इंक्रिमेन्ट का रोखण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचारी आचरण व नैतिक अधःपतनाच्या गैरवर्तनामुळे व अक्षम्य गंभीर कर्तव्यकृतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसा मध्ये मलीन झाल्याचा आक्षेप ठेवत कर्तव्यातील गंभीर कुचराई लक्षात घेत निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहे.

Img 20250103 Wa0009

पोलीस उप महानिरीक्षक चंद्रशेखर मीना यांच्या रडार वर असलेल्या जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई होणार हे अपेक्षित होते. मटका, जुगार, सुगंधित तंबाखू, गोवंश तस्करी, कोळसा चोरी यावर पोलीस प्रशासनाने लगाम लावलेला आहे. परंतु लपूनछपून अवैद्य व्यवसाय सुरूच आहे.

शनिवारी 29 जानेवारी ला पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकातील परिविक्षाधीन IPS अधिकारी गोहर हसन यांच्या नेतृत्वात वणीत चार मटका अड्डयावर धाडी टाकल्यात. तर दोन किरकोळ तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. दोन्ही कारवाईत तब्बल 9 लाखाच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकांनी केलेली कारवाई आणि या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वणी ठाण्यातील चौघांना निलंबित केले तर 19 कर्मचाऱ्यांना ‘शोकॉज’ देत केलेल्या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.

चक्क.. वैद्यकीय रजेवरील कर्मचारी निलंबित..!
कर्तव्य बजावताना जखमी झालेला पोलीस कर्मचारी पंकज उंबरकर मागील तीन महिन्यापासून वैद्यकीय रजेवर आहेत. मागील आठवड्यात झालेल्या ‘त्या’ कारवाईनंतर त्याला सुध्दा निलंबित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वणी: बातमीदार