Home Breaking News घनकचरा संकलन व व्यवस्थापनात “अनियमितता”

घनकचरा संकलन व व्यवस्थापनात “अनियमितता”

612
C1 20241123 15111901

MIM चे माजी नगरसेवक जलील कुरेशी आक्रमक

उमरखेडवसंत देशमुख : उमरखेड नगरपरिषदेत घनकचरा संकलन व व्यवस्थापन या योजनेत मोठी अनियमितता असल्याचा आरोप पत्र परिषदेत करण्यात आला. कचरा घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून तत्कालीन मुख्याधिकारी, स्थायी समितीचे सदस्य यांचेवर कारवाई करून नगराध्यक्षांना पदमुक्त करावे असा आक्रमक पवित्रा MIM चे माजी नगरसेवक जलील कुरेशी यांनी घेतला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत नगरपरिषदेत घनकचरा संकलन व व्यवस्थापन या योजने अंतर्गत तत्कालीन सत्ताधारी व प्रशासनाने कमालीची मनमानी केली. परिसर विकसित करणे, कचऱ्याचे विलीनीकरण करून विल्हेवाट लावण्यासाठी टीपर व टू ट्रेन पोकलेन चा वापर करणे अभिप्रेत होते. सदर कामाचे अंदाजपत्रक दहा लाखापेक्षा जास्त होणार असल्याने निविदा न काढता कामाच्या निकडी नुसार कामे करण्यात आल्याचा आरोप कुरेशी यांनी केला.

सदर कामाची देयके अदा करण्यापूर्वी नियमानुसार झालेल्या कामाबाबत स्थायी समितीची कार्योत्तर मान्यता घेऊन देयके अदा करणे गरजेचे होते. परंतु विविध प्रमाणकांद्वारे कामाची देयके कंत्राटदारास अदा केल्यानंतरच स्थायी समितीच्या सभेमध्ये प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीस्तव सादर करण्यात आल्याने अनागोंदी अधोरेखित होत आहे. नगराध्यक्षांनी अधिनियमातील कलम 58( 2 ) तरतुदीचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत आहे.

कचरा वाहतुकीसाठी जे वाहन क्रमांक दिलेले आहेत त्यापैकी काही वाहने दुचाकी व चार चाकी प्रकारातील असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. याप्रकरणी 2018 पासून वारंवार वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्यात. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्कालीन उप विभागीय अधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केल्यानंतर प्रधान सचिव यांनी अपात्र घोषित केले होते.

याप्रकरणी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यात आल्यानंतर 6 आठवड्यात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रकरण निकाली न काढल्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असता न्यायालयाने पुन्हा 4 आठवड्याचा कालावधी दिला होता मात्र प्रकरण मार्गी न लागल्याने पुन्हा दुसऱ्यांदा अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

नगर पालिकेतील कचरा घोटाळा प्रकरणी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अवर सचिव प्रतिभा पाटील यांचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. आता काय कारवाई होणार याकडे उमरखेड वासियांचे लक्ष लागले आहे. पत्र परिषदेत MIM चे माजी नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेते जलील कुरेशी, माजी स्वीकृत सदस्य रसूल पटेल, सय्यद अन्सार, अहेमद पटेल व कार्यकर्ते उपस्थित होते.
उमरखेड : बातमीदार