● हात की सफाई चा नवा फंडा
● दुकानदारांना लावल्या जातोय ‘चुना’
वणी: एक बाई तोंडाला स्कार्फ बांधून दुकानात येते, दीडशे रुपयाची खरेदी करते, दोन हजाराची नोट देते, उर्वरित रक्कम परत घेते आणि त्याच वेळेस तिला ‘कव्हर’ करणारा पुरुष किंवा तरुण सुद्धा दुकानात येतात आणि दुकानदारांना केवळ दोन हजाराचा ‘चुना’ दिवसाढवळ्या लावण्यात येत असल्याचे वास्तव शहरात उजागर झाले आहे.
दोन हजाराची नोट आणि टोळक्याच्या मनात ‘खोट’ असलेल्या ‘हात की सफाई’ चा नवा फंडा तिसऱ्या डोळ्यात कैद झाला. अशा भुरट्या टोळीच्या उपद्व्यापापासून आता लहानसहान व्यवसायिकांना सावध राहावे लागणार आहे.
शहरात मागील काही कालावधी पासून दुकानदारांना गंडवणारी टोळी सक्रिय झाली आहे. केवळ दोन हजार रुपयानेच व्यावसायिकांना ‘टोप्या’ घालण्यात येत असल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्याचे सौजन्य व्यावसायिक दाखवत नाही.
गुरुवारी दुपारी 12: 34 वाजता पटवारी कॉलनीतील गोविंद क्लिनिक जवळ असलेल्या काशिनाथ मेडिकल मध्ये हे बंटी- बबलीचे टोळके पोहचले. 180 रुपयाची वस्तू घेतली व दोन हजाराची नोट देऊन एक हजार 820 रुपये परत घेत हात चलाखीने स्वतः ची दोन हजाराची नोट सुध्दा परत घेत पोबारा केला. असाच प्रकार एक तासा पुर्वी चिखलगाव येथील ओम जगन्नाथ प्रोव्हिजन या किराणा दुकानात याच टोळक्याने केला.
दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत वस्तू खरेदी करून दोन हजाराची नोट देत गंडा घालण्याचा फंडा अवलंबण्यात येत आहे. एक महिन्यांपूर्वी ब्राम्हणी मार्गावरील मेडिकल मध्ये सुध्दा असाच उपद्व्याप अशा भुरट्या टोळक्याने केला आहे. पालिके समोर सुध्दा दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास केले होते. तेव्हा दुचाकी जवळ उभी असलेली महिलाच संशयित आहे. यामुळे शहरात बंटी- बबलीने हैदोस घातल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
वणी: बातमीदार





