● पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ?
● तो स्वतः आला की आणला, कोडे कायम
सुनील पाटील: पीडित महिलेवर वारंवार अत्याचार करणारा गंभीर गुन्ह्यातील आरोपी तब्बल आठ दिवसानंतर चक्क.. पोलीस ठाण्यात प्रकटतो, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना ‘तो’ बिनधास्त पलायन करतो ही गंभीर बाब असून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
घरा शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधण्यात येते, तिच्याशी लाघवी संभाषण करून जाळ्यात ओढण्यात येते. ओळखीच्या घरी बोलावून शीतपेय पाजल्या जाते आणि बळजबरीने अत्याचार करण्यात येतो. त्याच वेळी अश्लील छायाचित्र काढून वारंवार अत्याचार करण्यात येतो…अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपी ठाण्यात आला की आणला हे न उलगडणारे कोडे आहे.
पीडितेच्या घरा शेजारीच राहणारा आरोपी मिन्टू उर्फ सौरभ बोरूले (25) याला तब्बल आठ दिवसानंतर गुरुवारी पोलिसांनीच ‘विशाल‘ प्रयत्न करून उचलले असे बोलल्या जाते. मात्र पोलीस ठाण्यातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी API दर्जाच्या अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करणे गरजेचे आहे. 20 एप्रिलला पीडितेच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात आरोपीला आठ दिवसाची सवड कशी व का दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आरोपी स्वतः ठाण्यात हजर होईल याची वाट पोलीस प्रशासन बघत होते का ? आरोपी ठाण्यात आला असा उहापोह प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी आलेले गंडांतर दूर सारण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे.