● प्रदूषणात कमालीची वाढ, आरोग्यास हानी
वणी: राजूर कॉलरी येथील रेल्वे कोळसा सायडिंग गावातून हद्दपार करण्याचा निर्णय राजूर बचाव संघर्ष समितीने घेतला आहे. वाढलेले प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेला विपरीत परिणाम लक्षात घेता मंगळवार दि. 14 जूनला घेण्यात आलेल्या ग्रामसभेत रेल्वे कोळसा सायडिंग नकोच ही भूमिका घेत एकमताने ठराव पारित करण्यात आला.
ग्रामस्थांना हानी पोहचविणाऱ्या प्रश्नांवर ग्रामसभेने घेतलेले ठराव सर्वोतोपरी आहे. यामुळे संबंधित विभागाला आणि मंत्र्यांना ठराव पाठविण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
राजूर गावात असलेल्या रेल्वेच्या जागेवर रेल्वेने कोळसा सायडिंग सुरू केली आहे. गावात कोळशामुळे होणाऱ्या प्रदूषणाने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढेच नाही तर अक्षरशः घरात सुद्धा कोळशाची धूळ साचत असल्याने त्रस्त गावकऱ्यांनी राजूर बचाव संघर्ष समितीचे माध्यमातून ग्रामपंचायतला निवेदन सादर केले होते.
मंगळवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विविध महत्वपूर्ण विषयाचे ठराव पारित करण्यात आले. यात प्रामुख्याने राजूर येथील कोळसा सायडिंग मुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याने मानवी आरोग्यावर घातक दुष्परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिसरातील कोळसा वॉशरी धूलिकण प्रदूषणाला जबाबदार आहे. तसेच अनधिकृत कोल डेपो बंद करण्यात यावे याबाबत अन्य विषयावर महत्वपूर्ण ठराव एकमताने पारित करण्यात आलेत.
याप्रसंगी सरपंच विद्या पेरकावार, संघदीप भगत, अशोक वानखेडे, डेव्हिड पेरकावार, मो. अस्लम, कुमार मोहरमपुरी, डॅनी सॅन्ड्रावार, नंदकिशोर लोहकरे, साजिद खान, रफिक सिद्दीकी, रियाजुल हसन, सुशील अडकीने, ऍड.अरविंद सिडाम, जयंत कोयरे, ऍड. विप्लव तेलतुंबडे, मो. खुसनुर, किशोर मून, सुरज यादव यांची उपस्थिती होती. ग्रामसभेच्या यशस्वीतेसाठी ग्रामसेवक महेंद्र चहानकर व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले.
वणी: बातमीदार